कोल्हापूर महानगरपालिका : पूर बाधीत क्षेत्रातील 37 मिळकतींना नगररचना विभागाकडून नोटीसा
schedule28 May 25 person by visibility 307 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्या नगरचचना विभागाकडून ई वॉर्डातील 37 मिळकतींना आज नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये बापट कॅम्प, कदमवाडी, जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत, इंद्रजी कॉलनी या परिसरातील मिळकतींना या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर उद्याही नागाळा पार्क, रमणमळा, बावडा या परिसरातील मिळकतींना नोटीसा बजावण्यात येणार आहेत.
या नोटीशीमध्ये आपला भूखंड नियंत्रीत (Restrictive) सतर्कता (Alert) क्षेत्रामध्ये येत असल्याने प्रकल्पाच्या ठिकाणी लाईफ जैकेट (प्रति १० चौ. मी. बांधकाम क्षेत्राकरीता १ लाईफ जॅकेट), रेसक्यु बोट (२० हून अधिक सदनिका असणा-या इमारतीस), इमर्जन्सी लाईट इत्यादि सुविधा कार्यान्वित कराव्यात व तसा अहवाल कोल्हापूर महानगरपालिकेस सादर करावा.
तसेच प्रकल्पातील ट्रान्सफॉर्मर, पाण्याच्या टाक्या, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आदि सुविधा महत्तम पुररेषा पातळीवर कार्यान्वित कराव्यात. नागरिकांचे माहितीस्तव सदरचा भूखंड नियंत्रण/सर्तकता क्षेत्रात समाविष्ठ असलेने भूखंडाच्या दर्शनी भागात त्याबाबतचा फलक लावावा. आपत्कालिन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनाकरीता मॉक ड्रिलसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे संपर्क साधावा. या विभागाशी संपर्क साधल्यास आपणास त्याबाबत अग्निशमन विभागाकडून प्रात्याक्षिक सराव देण्यात येईल. या सर्व सुविधा प्रत्यक्ष जागेवर पुरविलेबाबत नगररचना व अग्निशमन विभागास अवगत करण्यात यावे. याप्रमाणे संबंधीत मिळकतींनी कार्यवाही न केलेस आपलेवर आपत्तीव्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कारवाई करणेत येईल याची नोंद घ्यावी असे कळविण्यात आले आहे.