प्रसिद्ध गायक केके यांचा वयाच्या ५३ व्या वर्षी अलविदा
schedule01 Jun 22 person by visibility 218 categoryमनोरंजन
नवी दिल्ली : बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक केके यांचे निधन झाले आहे. त्यांनी यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, केके कोलकाता येथे एका कॉन्सर्टसाठी गेले होते. पण कॉन्सर्टनंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर ते कोसळले. तब्येत बिघडल्याने केके यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
केके यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. केके यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. ही बातमी समोर येताच क्रीडा, मनोरंजनासह जगातील अनेक बड्या व्यक्ती सोशल मीडियावर तशोक व्यक्त करत आहेत. अभिनेता अक्षय कुमारनेही शोक व्यक्त केला आहे.
गायक केकेचे पूर्ण नाव कृष्णकुमार कुन्नथ आहे. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायकांपैकी एक, केके यांनी अनेक गाणी गायली आहेत. २३ ऑगस्ट १९७० रोजी जन्मलेल्या केकेने हिंदी व्यतिरिक्त मराठी, बंगाली, गुजराती, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि तमिळ गाण्यांना आवाज दिला आहे. त्यांचा गोड आवाज सर्वांच्या मनाला भिडला.
केकेने दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी माल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. केकेने चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वीच जवळपास ३५००० जिंगल्स गायल्या होत्या. याशिवाय १९९९ च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान त्यांनी भारतीय संघाच्या समर्थनार्थ 'जोश ऑफ इंडिया' हे गाणे गायले होते. नंतर केकेने 'पल' या म्युझिक अल्बममधून गायक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली आणि मागे वळून पाहिले नाही.
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर केकेने मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीही स्वीकारली. त्यांच्या नशिबात बॉलीवूडमध्ये येणे लिहिले होते. त्यांनी मधेच नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये येऊन मनोरंजन विश्वात नाव कमावले. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील 'तडप तडप' गाण्याने केकेला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला. या गाण्यानंतर त्यांची गणना मोठ्या गायकांमध्ये होऊ लागली. 'यारों', 'पल', 'कोई कहे कहता रहे', 'मैंने दिल से कहा', 'आवारापन बंजारापन', 'दस बहाने', 'अजब सी', 'खुदा जाने' आणि 'दिल इबादत', 'तू ही मेरी शब है' ही त्यांची प्रमुख गाणी आहेत. सारखी गाणी.