सातारा येथे महामार्गावर शिवशाही बस जळून खाक; वाहनचालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला
schedule11 Sep 24 person by visibility 261 categoryराज्य
सातारा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने काल दुपारी सातारा जिल्हा हद्दीतील वाढे फाटा रस्त्यावर अचानक पेट घेतला. या अपघातात वाहनचालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या भीषण आगीत सर्व प्रवासी बचावले.मात्र या बसमध्ये काही प्रवाशांची मौल्यवान वस्तू तसेच बॅग व साहित्य जळून खाक झाले.
सांगली आगाराचे चालक दादासाहेब कोळेकर हे स्वारगेट येथून सकाळी(एम. एच.११ बी डब्लू ३२२२) ही शिवशाही बस घेऊन कोल्हापूर कडे येत होते. बस सातारा जिल्ह्याच्या वाढे फाटा येथे पोहोचली. दुपारी दोनच्या सुमारास शिवशाही बसच्या मागील टायरने अचानक पेट घेतला. तात्काळ चालकाने पेटत्या बसला रस्त्याच्या कडेला उभे केल्याने मोठा अनर्थ टळला. प्रवासी यांना वाहनातून खाली उतरवले व त्यांचा जीव वाचवला. या बस मध्ये 30 प्रवासी होते.
त्यानंतर सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष असे प्रयत्न केले. यावेळी रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच एस.टी. महामंडळाच्या सातारा विभागातील विभाग नियंत्रक रोहन पलंगे, वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड, सुरक्षा अधिकारी शेखर फरांदे, विकास माने, पोलीस अधिकारी विकास धस, तानाजी माने, उमेश बगाडे, नंदकुमार महाडिक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या बसमध्ये काही प्रवाशांची मौल्यवान वस्तू तसेच बॅग व साहित्य जळून खाक झाले.