कोल्हापूर : उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई, 31 हजार 700 रुपयांचा दंड वसूल
schedule02 Sep 26 person by visibility 13 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : शहरातील अस्वच्छता, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे तसेच प्लास्टिक वापराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक व आस्थापनांविरोधात कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार व उपआयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या कारवाई अंतर्गत आज शहरातील विविध भागांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गंगावेश येथील तोडकर संजीवनी ॲण्ड आयुर्वेदिक सेंटरने वैद्यकीय साहित्य उघड्यावर जाळल्याने 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ताराबाई पार्क, मंगळवार पेठ व शाहूपुरी येथे उघड्यावर खरमाती टाकणाऱ्या चार नागरिकांकडून प्रत्येकी 5 हजार रुपये याप्रमाणे 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लक्ष्मीपुरी विल्सन पूल, बिंदू चौक व मंगळवार पेठ परिसरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या चार नागरिकांवर कारवाई करून 6 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारे एकूण 31 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरातील स्वच्छता अबाधित ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी होणारे उपद्रव रोखणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासोबतच महापालिकेकडून शहरात जनजागृती मोहीमही राबविण्यात येत असून, नागरिक व व्यावसायिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिक, व्यावसायिक व विक्रेत्यांनी दैनंदिन कचरा केवळ महापालिकेच्या अधिकृत घंटागाडीकडेच द्यावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर कचरा जाळणे, रस्त्यावर अथवा नाल्यात कचरा टाकणे तसेच प्लास्टिक वापरासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणे आढळल्यास संबंधितांवर लागू नियम व कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आवश्यकतेनुसार संबंधितांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे.
शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता नियमांचे पालन करून महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.