समर्पणाच्या भावनेतून ‘अनुलोम’चे काम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
schedule08 Feb 26 person by visibility 107 categoryराज्य
नाशिक : देशविकासासाठी समर्पणाची भावना खूप महत्वाची आहे. अनुलोमचे स्वयंसेवक याच भावनेतून काम करीत आहेत ही खूप सुंदर आणि मोलाची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आजही समाजातील ज्या व्यथा आहे त्या दूर करण्याचे काम अनुलोमच्या माध्यमातून करू शकतो. चांगली समाजनिर्मिती ही तुमच्या कामाची प्रेरणा असावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अनुगामी लोकराज्य अभियानाच्या वतीने कापसे फाऊंडेशन (वडगाव बल्हे तालुका येवला) येथे अनुलोम संगम 2026 चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी अनुलोम प्रमुख स्वानंद ओक, सुजाता मराठे, अंबादास जोशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार (गुंतवणूक आणि धोरण) कौस्तुभ धवसे, पद्मश्री दादा लाड, अतुल वझे या मान्यवरांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, अनुलोमने प्रगतिशील समाजामध्ये जे कार्य उभे केले ते महत्वाचे आहे. उत्तम, सुंदर आणि बहुमोल कार्य अनुलोमच्या माध्यमातून होत आहे. समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व तयार करण्याचे काम आहे अशी क्षेत्र अनुलोमने निवडली. आज देश प्रगती करत आहे. यापुढील काळातही अनुलोमने राष्ट्रनिमितीसाठी योगदान देण्याचे आणि समरसतेसाठीचे काम अधिक व्यापक स्वरूपात पुढे न्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाज भेदभावरहित असेल, एकजूट असेल, त्यासाठी कार्य होत आहेत. या कार्यात पाचशे महिला स्वयंसेवकांचा संवादिनीच्या माध्यमातून सहभाग हे समरसतेचेच उदाहरण असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले.
समर्पणाची भावना असेल तरच अनुलोमचे काम करता येणे शक्य आहे. त्यामुळेच यामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवकांचे महत्व आहे. हा परिवार मोठा होत गेला पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुलोमच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक अनुलोम प्रमुख स्वानंद ओक यांनी केले. यावेळी पद्मश्री दादा लाड आणि कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच अनुलोमच्या कामात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या जनसेवकांचा सत्कारही मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला.
कापसे फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घेतली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.