माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अनंतात विलीन
schedule28 Dec 24 person by visibility 233 categoryदेश
नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान, जगविख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे शुक्रवारी निधन झाले. आज दिल्लीच्या निगमबोध घाट येथे डॉ. मनमोहन सिंग यांचा अंत्यविधी पार पडला. शासकीय इतमातात मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमोहन सिंग अमर रहेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेल्याचं पाहायला मिळाले. लाडक्या नेत्याला निरोप देताना सर्वच जन भावुक झाले होते.
गुरुवारी रात्री मनमोहन सिंग यांचे निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातील बड्या नेत्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या.
आज सकाळी मनमोहन सिंग यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानातून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले. याठिकाणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांनी सिंग यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर काँग्रेस मुख्यालय ते निगमबोध घाटपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती दौपदी मुर्मुम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, यांच्यासह भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि अन्य पक्षांमधील अनेक दिग्गज नेते त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.