आर्किटेक्चर अभ्यासक्रमाचे नाटा(NATA) परीक्षेचे केंद्र आता वारणेत
schedule05 Feb 25 person by visibility 226 categoryशैक्षणिक
वारणानगर : वास्तुकला (आर्किटेक्चर) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, नवी दिल्ली यांच्यावतीने नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (नाटा-NATA) परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेच्या तयारीसाठी देशातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या, वारणा विद्यापीठ परिसरात कार्यरत असणाऱ्या तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, वारणानगर येथे नाटा परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र तसेच परीक्षा केंद्र चालू करण्यात येत आहे.
नाटा ही परीक्षा बॅचलर ऑफ आर्किटेक्चरच्या ऍडमिशनसाठी अनिवार्य आहे.
देशभरात आर्किटेक्चरची ४०० कॉलेज असून, तेथील एकूण उपलब्ध प्रवेश जागा २५ हजार इतक्या आहेत. या जागावरील प्रवेशासाठी कौन्सिलच्यावतीने दरवर्षी नाटा अभियोग्यता चाचणीचे आयोजन केले जाते. त्यात ड्रॉईंग आणि सामान्यज्ञान, बुध्दिमत्ता चाचणीवर आधारित दोन पेपर घेतले जातात. दुसरा पेपर हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा असतो. सदरची परीक्षा मार्च 2025 ते जून 2025 अखेर शुक्रवार आणि शनिवारी, सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात घेण्यात येईल.
सदर नाटा अभियोग्यता चाचणी नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी www.nata.in या संकेतस्थळाचा आधार घ्यावा.
तरी बारावीच्या विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कॉलेजचे प्राचार्य आर्किटेक्ट राजेंद्र ऐनापुरे यांनी केले आहे. हे सेंटर चालू करण्यासाठी संस्थेचे सी.ई.ओ. डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी आणि वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांचे मार्गदर्शन लाभले.