ओंजळ : नवोन्मेषी काव्यानुभूतीचा आविष्कार
schedule05 Feb 25 person by visibility 190 categoryसामाजिक
कोल्हापूर : ओंजळ...! मानवी जीवन आणि परिसर, परिस्थिती, सदासतेज भूरळ घालणारा निसर्ग यांच्यातील घटना, घडामोडी आणि अनुभव यांचा शब्दसंभार आपल्या दोन्ही करांच्या ओंजळीतून रसिकांच्या मनात घर करून राहणारा प्रातिनिधिक काव्यसंग्रह...!, कविता ही कविमनाचा हुंकार असतो, अंतरीचे गुज असते, आणि हे गुज रसिकांपर्यंत पोहोचविणे, हे सामाजिक कर्तव्य मानणारे डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांच्या प्रयत्नातून करवीर काशी फौंडेशन च्या माध्यमातून ओंजळ हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे.
हा संग्रह वाचतांना अनेक विषयांचा विविध दृष्टिकोनातून केलेला उहापोह हे या संग्रहाचे वैशिष्ट्य लक्षात येते. या काव्यसंग्रहाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या संग्रहात प्रत्येक कवीचे छायाचित्र व परिचय स्वतंत्र पानावर दिला आहे. यातून साहित्याविषयी आत्मियता व साहित्यिकांचे आदरातिथ्य ही करवीर काशी फौंडेशन ची ओळख अधोरेखित होते.
या संग्रहात ४५ कवी कवयित्रींच्या प्रत्येकी दोन रचना आहेत. अनेक रचना मनाला अंतर्मुख करणाऱ्या आहेत. सर्वच कविता वाचनिय व विचारप्रवर्तक आहेत.
प्रार्थनेचा घेता आधार
नष्ट होईल हृदयीचा अंधार
या शब्दात गंगाराम रहाटे यांनी जीवनातील प्रार्थनेचे महत्त्व विषद केले आहे.
.....झोपडीतनं महालाचे स्वप्न पाहू द्या,
आम्हाला ही जगायचं आहे, थोडं जगू द्या...!
ही कवयित्री वैशाली पाटील हिची आर्त साद या व्यवहारी जगात वाचकांना व्याकूळ करते.
या संग्रहात एकीकडे पिळवटून टाकणारी गरीबी आणि दुसरीकडे भ्रष्टाचारी जगाची उत्तुंग श्रीमंती हे विदारक सत्य कवी उत्तम तलवार यांनी रेखाटले आहे. धावत्या जगात स्वत्व टिकवून परोपकारी जीवन जगण्यासाठी कवी महादेव बुरुटे लिहितात.
उधळून लाव,
गनिमांचे डाव,
अबाधित ठेव आत्मराजा...
या संग्रहात संघर्ष, समाजरुढी, परंपरा यांनी व्यथित झालेला सामान्य माणूस भेटतो. दुष्काळात पिचलेला बळिराजा व त्याचं दुःख, मायपित्याचे प्रेम, वात्सल्य, भेटते, तर तारुण्यात फुलणारे फुलपाखरासारखे स्वच्छंदी प्रेम, मातृभूमी वरील अढळ श्रद्धा, पोटापाण्यासाठीचा संघर्ष, दूर गेलेल्या पोटच्या पोराच्या वाटेकडे टक लावून बसणारी माय अशा मानवी भावछटा या संग्रहात पानोपानी दिसतात.
कवी निवृत्ती मसवेकर यांनी केलेलं ' माझं माहेर कोल्हापूर ' या कवितेतील राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीचं बहारदार वर्णन पुन्हा पुन्हा वाचावसं वाटतं.
मौज आहे,मस्ती आहे, तेलापेक्षा दारु स्वस्त आहे. कवी प्रल्हाद खरे यांनी व्यसनाधीनतेचं वास्तव मांडलं आहे. तर
बाबासाहेब..., तुम्ही दिली, लोकशाही या देशाला...
या कवी पोपट कांबळे यांच्या रचनेतून दलितांच्या दुःखाला वाचा फोडली आहे.
सुरेख मुखपृष्ठ, सुबक छपाई, पुस्तक मूल्य जपणारा उन्मेषी काव्यानुभूती घडवणारी हा काव्यसंग्रह पुन्हा पुन्हा वाचावा असा आहे. ज्येष्ठ कवयित्री मंदा कदम यांची प्रस्तावना काव्याचे परिक्षण करतांनाच नवोदित कवींना मार्गदर्शन करते, साहित्यिकांचे कोडकौतुक करणारे करवीर काशी फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
✍️ डाॅ. संदीप प्रभुगावकर, शिरोडा,गोवा
▪️ओंजळ
प्रातिनिधिक काव्यसंग्रह
संपादक: सुनीलकुमार सरनाईक.
प्रकाशक: करवीर काशी फौंडेशन, माधव स्मृती, ३५८,ए, वसंतराव सरनाईक पथ, शिवाजी पेठ, कोल्हापूर -४१६०१२
पृष्ठे:१००, स्वागतमुल्य: ₹ ५०/-