कोल्हापुरात पिस्तुलच्या धाकाने १३ लाखाला लुटले; कामगारास मारहाण; संशयित सीसीटीव्हीत कैद
schedule18 Aug 24 person by visibility 487 categoryगुन्हे
कोल्हापूर : येथील साई एक्स्टेन्शन परिसरातील स्टील व्यावसायिक संकेत बन्सल ऑफिसमध्ये घुसून दोघा अज्ञातांनी कामगारास पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत सुमारे १३ लाख २९ हजाराची रक्कम लंपास केली. शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. लक्ष्मण विलास काणेकर (वय ४८ रा. दौलतनगर, कोल्हापूर) याने शाहपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
स्टील होलसेल व्यापारी संकेत ललित बन्सल (रा. नागाळा पार्क) वांचे साई एक्स्टेशन येथे गजलता आर्केडमध्ये कार्यालय आहे. आठवडयातून एक-दोन दिवसच हे कार्यालय उघडले जाते. इतर वेळी ते बंद असते, बन्सल यांच्याकडे कार चालक म्हणून लक्ष्मण काणेकर हे गेल्या दहा वर्षापासून काम करतात, मालक बन्सल यांचा काणेकर यांच्यावर विश्वास असल्याने ऑर्डरची पैसे
गोळा करून आणून शाहूपुरी येथील कार्यालयात आणून ठेवण्याचे काम काणैरकर करतात. शनिवारी सकाळी बन्सल यांनी सांगितल्याप्रमाणे सळई विक्री झालेले ३ लाख रुपये, तसेच दोन व्यावसायिकाकडून आलेले दहा लाख रुपये असे १३ लाख २९ हजार रुपये शाहूपुरी येथील कार्यालयात मोजून ठेवून ते दुपारी दोन ते अडीच वाजता कार्यालयात बसले होते.
यावेळी हेल्मेट घातलेला एक जण कार्यालयात आला. बॅगेतून त्याने पिस्तुल काढून कानेकर यांच्या पोटाला लावले. त्यानंतर दुसरा साथीदार हातात चाकू घेऊन आला. त्याने तोंडाला स्कार्फ बांधून डोक्याला टोपी घातली होती. हिंदी भाषेत बोलत चिल्लाओगे तो मार देंगे, पैसे किधर है, असे म्हणून काणेकर कोपऱ्यात घालून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना खुर्चीला बांधून घातले. तोंडाला डोळ्यांना चिकट टेप लावून बांधून घालून ड्रॉव्हरच्या चाव्या घेऊन तो उघडला. त्यानंतर जमा झालेले १३ लाख २९ हजार रुपये घेऊन ते पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर, सहायक पोलीस निरीक्षक विशाल मुळे, हवालदार तानाजी चौगुले यांच्यासह पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याकार्यालयात सीसीटीव्ही नाहीत, मात्र कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित कैद झाले आहेत.