25 जानेवारी रोजी 16 वा राष्ट्रीय मतदार दिन
schedule20 Jan 26 person by visibility 60 categoryराज्य
कोल्हापूर : 25 जानेवारी 2026 रोजी 16 वा राष्ट्रीय मतदार दिन जिल्हास्तर, तालुकास्तर व मतदान केंद्र स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनासाठी भारत निवडणूक आयोगाकडून ‘My India My Vote’ हा विषय (Theme) देण्यात आला आहे.
या अनुषंगाने, दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 10.30 ते 11 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मतदार शपथ घेण्यात येणार आहे. तसेच दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.45 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय 16 वा राष्ट्रीय मतदार दिन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत सिनेट हॉल, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी गीता गायकवाड यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यासाठी सर्वसमावेशक प्रचार-प्रसाराचा आराखडा, जिल्हास्तरीय आयकॉन व्यक्तींचा समावेश, विविध संस्थांची भागीदारी व सहयोग, तसेच समाजमाध्यमांद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. याशिवाय, मतदार केंद्रस्तर व जिल्हास्तरावर कार्यक्रम राबविताना पाळावयाच्या सूचनाही आयोगाकडून देण्यात आल्या असून त्यांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सध्या इतर राज्यांमध्ये मतदार यादींच्या सखोल पुनरिक्षणाचा (SIR) कार्यक्रम सुरु असून, महाराष्ट्रातही नजिकच्या कालावधीत भारत निवडणूक आयोगामार्फत हा कार्यक्रम राबविण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने, पूर्वतयारीचा भाग म्हणून सध्याच्या मतदारांचे 2002 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरिक्षणाअंती तयार करण्यात आलेल्या मतदार यादीतील मतदारांशी मॅपिंग करण्यात येत आहे. तसेच सध्याच्या मतदार यादीतील अस्पष्ट छायाचित्रे, दुबार नोंदी (PSE/DSE) व अतार्किक चुका याबाबत पडताळणी सुरू आहे.
या सर्व बाबींविषयी NVD-2026 च्या कार्यक्रमात जनजागृती करण्यात यावी. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या ‘Call a BLO’ (मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याशी संपर्क) या अभियानाबाबतही मतदारांना माहिती देण्यात यावी, अशी माहिती अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे.