23 वी छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा 2024-25 : मुंबई शहर पूर्व, पुणे ग्रामीण छत्रपती शिवाजी महाराज चषकाचे मानकरी
schedule20 Jan 25 person by visibility 201 categoryक्रीडा
पुणे ः महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरूष विभागात मुंबई शहर पूर्व तर महिला विभागात पुणे ग्रामीण संघांनी विजेतेपद मिळविले.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई शहर पुर्व संघाने पुणे ग्रामीण संघावर 35-31 असा विजय मिळवित छत्रपती शिवाजी महाराज चषकावर आपले नाव कोरले. महिलांच्या अंतिम सामन्यात पुणे ग्रामीण संघाने बाजी मारली. मुंबई शहर पश्चिम संघावर 37-28 असा विजय मिळवित स्पर्धेतील आपले वर्चस्व कायम राखले. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथमच 44 लाख 60 हजार रूपयांची बक्षिसे देण्यात आली.
बारामतीमधील रेल्वे मैदानावर संपलेल्या दिमाखदार कबड्डी स्पर्धेचे पारितोषिक वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे,महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, शकुंतला खटावकर व माया आक्रे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य खेळाच्या बाबतीत अग्रेसर राहिला पाहिजे, खेळाडूंना बक्षिसाच्या माध्यमातून भरीव रक्कम मिळाली पाहिजे यादृष्टीने क्रीडा क्षेत्राशी निगडित प्रश्न मार्गी लावण्याकरीता राज्यशासनाचा सकारात्मक प्रयत्न आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकार बँकेच्यावतीने कबड्डी खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेस 95 लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
▪️पुणे ग्रामीण व मुंबई शहर पुर्व
पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई शहर पुर्व संघाने पुणे ग्रामीण संघावर 35-31 असा विजय मिळवित छत्रपती शिवाजी महाराज चषकावर आपले नाव कोरले. मद्यंतराला मुंबई शहर पुर्व संघाकडे 17-9 अशी आघाडी होती. मुंबई शहर पुर्वच्या प्रणय राणे व शार्दुल पाटील यांनी आपल्या जोरदार खेळाच्या जोरावर आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर संकेत सावंत याने उत्कृष्ठ पकडी घेतल्या. पुणे ग्रामीणच्या अक्षय सूर्यवंशी व अजित चौहान, जीवन डोंबले यांनी जोरदार प्रतिकार केला. तर स्वप्नील कोळी याने पकडी घेतल्या.
▪️पुणे ग्रामीण व मुंबई शहर पश्चिम
पुणे ग्रामीणच्या खेळाडूंनी सामन्याच्या सुरवातील अत्यंत अडखळत सुरवात केली होती. मात्र थोड्यात वेळा सलोनी गजमल व निकिता पडवळ यांनी आपल्या अत्यंत आक्रमक खेळाने संघाला सावरले व संघाला विजय मिळवून दिला. रेखा सावंत हिने मुंबई शहर पश्चिमची संघनायक असलेल्या सोनाली शिंगटेच्या पकडी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. मुंबई शहर पश्चिमच्या सोनाली शिंगटे हिने एकाकी लढत दिली. तर पूर्णिमा जेधे व साधना विश्वकर्मा यांनी चांगल्या पकडी केल्या.