राज्यात ६०४ आपला दवाखाने सुरू; उर्वरित ९६ दवाखाने जानेवारी अखेर सुरू – मंत्री प्रकाश आबिटकर
schedule10 Dec 25 person by visibility 52 categoryराज्य
कोल्हापूर : ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’च्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला आरोग्याच्या सर्व सुविधा तत्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही योजना अधिक व्यापकपणे राबविण्यात येईल. राज्यात सध्या या योजनेंतर्गत ६०४ आपला दवाखाने सुरू असून उर्वरित ९६ दवाखाने येत्या जानेवारी अखेर सुरू करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व आरोग्य वर्धिनी केंद्र राज्यात पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य अभिजीत वंजारी, सचिन अहिर, प्रसाद लाड, परिणय फुके, निरंजन डावखरे, रणजितसिंह मोहिते, राजहंस सिंह, शशिकांत शिंदे, श्रीमती उमा खापरे, मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.
सर्वसामान्य व गरीब नागरिकांसाठी असल्याने ती अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.
मंत्री आबिटकर म्हणाले, राज्य शासनामार्फत ७०० हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व केंद्र शासनाच्या १५ वित्त आयोगाच्या निधीतून २,२३२ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. यापैकी ६०४ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व १,६४३ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, राज्यात सुरू असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राची संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत देखरेख केली जात आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये फार्मसिस्ट नियुक्तीबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे सांगून मंत्री आबिटकर म्हणाले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या प्रभावी कामकाजासाठी सर्व संबधित सदस्यांसमवेत बैठक घेतली जाईल.