अर्थपूर्ण समस्या सोडवण्याची ‘जबाबदारी’ अभियंत्यानी घेतली पाहिजे : दीपक जोशी; राष्ट्रीय स्तरावरील ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-२५’ स्पर्धा केआयटी मध्ये संपन्न
schedule10 Dec 25 person by visibility 86 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी ( प्रदत्त स्वायत्त ) महाविद्यालयामध्ये नुकतीच स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन -२५ ही स्पर्धा संपन्न झाली. भारत सरकारच्या शिक्षण विभागाच्या इनोव्हेशन सेल्सच्या वतीने व ए.आय.सी.टी.ई यांच्या सहकार्याने अंतिम फेरीच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ मंगळवार ,९ डिसेंबर २५ रोजी रात्री उशिरा संपन्न झाला.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संपूर्ण झालेल्या स्पर्धेचा सारांश या स्पर्धेचे मुख्य आयोजक, संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी उपस्थितांसमोर मांडला. ८-९ डिसेंबर २५ रोजी संपन्न झालेल्या स्मार्ट इंडिया स्पर्धेच्या स्पर्धकाच्या कोल्हापुरात पाऊल ठेवल्यापासून ते अंतिम सत्रा पर्यंत झालेल्या सर्व टप्प्यांची माहिती त्यांनी सर्वाना करून दिली. स्पर्धक,मार्गदर्शक यांना दिलेल्या सर्व प्रकारच्या सुविधा,परीक्षकांकडून त्यांना मिळालेले मार्गदर्शन, जोश टिकवण्यासाठी मध्यरात्री आयोजित केलेला सांस्कृतिक कार्यक्रम, पहाटे संपन्न झालेला योगा,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेला संवाद,तीन फेऱ्यांमध्ये झालेले मूल्यांकन या सर्वांचा सारांश त्यांनी आपल्या प्रस्ताविकात घेतला. स्पर्धकांच्या सकारात्मक प्रयत्नांचे,ज्ञानाचे,सांघिक कामाचे कौतुक केले व त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या एआयसीटीई च्या माध्यमातून नियुक्त केलेल्या नोडल प्रमुख श्रीमती आकांक्षा शेजाळ यांनी या स्पर्धेची राष्ट्रीय स्तरावरील आवश्यकता, व्यापकता आणि त्यातील विद्यार्थी, मार्गदर्शक यांचा सहभाग याबाबत आकडेवारीसह माहिती दिली. ही स्पर्धा जगातील सगळ्यात मोठी भारतीय विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य पणाला लावणारी व देशाच्या बौद्धिक क्षमतेची चुणूक दाखवणारी आहे असा उल्लेख त्यांनी या स्पर्धेबाबत केला. या सर्व आयोजनात केंद्र सरकारपासून केआयटी कॉलेज पर्यंत ज्यांनी ज्यांनी छोटे मोठे योगदान दिले त्या सर्वांचे त्यांनी एआयसीटीई च्या वतीने आभार मानले.या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते श्री दीपक जोशी, व्हाईस प्रेसिडेंट ह्यूमन रिसोर्स टाटा ऑटो-कॉम्प लिमिटेड.या स्पर्धेच्या माध्यमातून देशपातळीवरील प्रश्नांना थेट भेटण्याची संधी तरुण अभियंत्यांना देण्याच्या कृतीशील विचाराबद्दल त्यांनी भारत सरकारच्या आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. आपल्या मार्गदर्शनात ते पुढे म्हणाले " सकारात्मक मनस्थिती, त्या दृष्टीने केलेले कष्ट, उपलब्ध असलेल्या विविध संधीचा केलेला योग्य वापर व या सर्वांच्या सोबतच आत्मनिर्भर व विकसित भारताचे स्वप्न हेच आपल्या भविष्यातील यशाचा पाया रचेल ". अर्थपूर्ण समस्या,त्या सोडवण्यासाठी त्याची घेतलेली जबाबदारी, त्यासाठी केलेले कष्ट ,वापरलेले वैयक्तिक ज्ञान, कौशल्य, वैचारिक प्रगल्भता या मधून आपण त्या समस्येवर कायमचा तोडगा काढू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या बाबतची विश्वासार्हता वाढवण्यासाठी अभियंता तरुण पिढीने उद्योजकीय मानसिकता बाळगून,त्याला पूरक असणाऱ्या इकोसिस्टीमचा सकारात्मक वापर करून या देशातील लाखो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे आवाहन त्यांनी स्पर्धकांना केले.
यानंतर विविध राज्यातून आलेले विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक यांनी या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल व केआयटीच्या सहकार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. सर्वप्रकारच्या केलेल्या व्यवस्था, सहकार्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले व सर्वांचे आभार मानले. स्पर्धेच्या मूल्यांकनासाठी उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातून सहभागी झालेल्या सर्व परीक्षकांचे व्यक्तींचे अभिनंदन स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले.सहभागी झालेल्या २८ संघांना सहभाग प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.याच वेळी ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-२५’ स्पर्धेच्या उत्तम नियोजनाबद्दल केआयटी चे मुख्य आयोजक, संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, स्पर्धा संयोजक प्रा.अजय कापसे, सहसंयोजक प्रा.प्रवीण गोसावी यांचा विशेष सन्मान यावेळी मुख्य अतिथी श्री दीपक जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
बक्षीस वितरण मुख्य अतिथी दीपक जोशी, केआयटीचे चेअरमन श्री साजिद हुदली, संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, एआयसीटीई नियुक्त केंद्रप्रमुख श्रीमती आकांक्षा शेजाळ यांच्या हस्ते प्रत्येक संघास स्मृतीचिन्ह, रोख रक्कम रु.१,५० लाख, प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनात संस्थेचे उपाध्यक्ष सचिन मेनन,सचिव दीपक चौगुले याचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रुति काशीद व प्रा शुभदा सावखंडे यांनी केले. या स्पर्धेचे आभार प्रदर्शन या स्पर्धेचे सहसंयोजक प्रा. प्रवीण गोसावी यांनी केले.. या परितोषिक वितरणासाठी सर्व विश्वस्त,या स्पर्धेचे मुख्य संयोजक प्रा.अजय कापसे, रजिस्ट्रार,सर्व विभागांचे विभाग प्रमुख, अधिष्ठाता, प्राध्यापक, मार्गदर्शक,स्वयंसेवक विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▪️विविध ६ विभागात घेतलेल्या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
विभाग १ – टेक बास्टिक, इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी लखनऊ.
विभाग २ - केबल सेन्स, के.के.वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक
विभाग ३ – अल्गो सॅपीन्स, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा पुणे.
विभाग ४ - टीम के-वॉर्सीस, यशवंतराव चव्हाण इंजिनिअरिंग कॉलेज ,नागपूर
विभाग ५ – पारितोषिक विभागून
अ) आयडिया ब्लिस, एमआयटी युनिव्हर्सिटी पुणे.
ब) अग्रतस, के.के.वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक
विभाग ६ - हॅक फोर इम्पॅक्ट,बीएमएस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, बेंगलोर