महाराष्ट्रातील ९.८६ कोटी मतदारांची पडताळणी होणार
schedule14 May 26 person by visibility 103 categoryराज्य
◼️ मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेची घोषणा
नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'विशेष संक्षिप्त पुनरीक्षण-तिसरा टप्पा' (एसआयआर फेज-३) राबवण्याचे अधिकृत आदेश दिले आहेत. या महत्त्वाकांक्षी मोहिमेत महाराष्ट्राचा प्रामुख्याने समावेश असून, राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख ६४ हजार ४१३ मतदारांच्या नोंदी अद्ययावत केल्या जाणार आहेत. चालू असलेल्या जनगणनेच्या 'हाऊस लिस्टिंग' प्रक्रियेचा विचार करून आयोगाने हे वेळापत्रक आखले असून, हवामानाची प्रतिकूलता लक्षात घेता केवळ हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाख या भागांना या टप्प्यातून वगळण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील या मोहिमेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून एकूण ९७,९२४ बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांच्या ९६,९४९ बूथ लेव्हल एजंट्सची (बीएलए) मदत घेतली जाणार आहे.
आयोगाच्या वेळापत्रकानुसार, २० जून ते २९ जून २०२६ या काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल, त्यानंतर ३० जूनपासून प्रत्यक्ष घरोघरी भेटी देऊन पडताळणी करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. ही मोहीम २९ जुलैपर्यंत असणार आहे.
राज्यातील मतदारांसाठी ५ ऑगस्ट २०२६ ही तारीख महत्त्वाची ठरणार आहे, कारण याच दिवशी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. यानंतर ४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना आपल्या नावातील दुरुस्ती, पत्ता बदल किंवा नवीन नाव नोंदणीसाठी दावे आणि हरकती सादर करता येतील. सर्व हरकतींचा निपटारा केल्यानंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे.
निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि सर्वसमावेशक होईल. या मोहिमेमुळे आगामी निवडणुकांसाठी राज्याकडे एक त्रुटी मुक्त आणि अद्ययावत मतदार डेटाबेस उपलब्ध होणार आहे. पहिल्या दोन टप्प्यांत देशातील ५९ कोटी मतदारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पंजाब यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये कामाला वेग येणार आहे.