कोल्हापूर महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये सोलर यंत्रणा बसविणार : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
schedule14 May 26 person by visibility 106 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सर्व कार्यालये, पंपिंग स्टेशनमध्ये सौरऊर्जा (सोलर) यंत्रणा बसविण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून विद्युत बिलामध्ये कपात होऊन महापालिकेचा मोठा खर्च वाचेल, अशा सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज आयुक्त कार्यालयात या विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत आयुक्त डॉ. भारुड यांनी EESL कंपनीकडून मागील एक वर्षापासून एलईडी पथदिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम समाधानकारक होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. शहरात वाढत्या पथदिव्यांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर संबंधित कंपनीसोबतचा महापालिकेचा करार रद्द करण्याची कार्यवाही अंतीम टप्यात असून शासनामार्फत नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेमार्फत पथदिव्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे महासभेच्या मान्यतेनंतर करण्यात यावीत. संबंधित संस्थेने नियुक्तीपूर्वी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, बंद पडलेले दिवे तातडीने सुरू करण्यासाठी साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा आणि वर्कऑर्डर मिळताच शहरातील सर्व दिवे पूर्ववत सुरू करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. विद्युत विभागातील तांत्रिक कामकाजासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची यादी तयार करावी. गरजेनुसार एजन्सीमार्फत पदभरती करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहायक अभियंता नारायण पुजारी, कनिष्ठ अभियंता अमित दळवी तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.