संस्कृती एक अभ्यास
schedule25 Nov 24 person by visibility 199 categoryसामाजिक
संस्कृती या संकल्पनेच्या अनेक व्याख्या केल्या गेल्या आहेत. संस्कृती म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर 'संस्कार' हा शब्द येतो. भारतीयसंदर्भात 'संस्कार' हा शब्द धर्माशी निगडित होतो. 'संस्कार' मध्ये कृतीही येते. 'संस्कृती' या शब्दाची फोड 'सम् + कु अशी केली जाते. संस्कृत धातू 'सम्'चा अर्थ काही शुभ-पवित्र उदात्त सुंदर अभिजात श्रेष्ठ या शब्दांच्या अर्थच्छटांशी जोडलेला आहे. 'कृ' काही कृती करणे. या कृती भौतिक बाह्यकृती असतात, तशाच त्या मानसिक कृतीही संभवतात. 'संस्कृती' मध्ये भव्य- उदात्त मूल्यवान आंतरिक व बाह्यकृती संभवतात.
'संस्कृती' शब्दाचा वापर विविध पातळ्यांवर, ज्ञानशाखांमध्ये विविधतेने होतो. उदाहरणार्थ, 'भारतीय संस्कृती, 'महानगरी संस्कृती', 'अमेरिकन संस्कृती','लोकसंस्कृती', 'पाश्चात्य संस्कृती', 'कामगारांची संस्कृती','कृषी-संस्कृती', 'ग्रामीण संस्कृती', 'इस्लामी संस्कृती', 'चंगळवादी संस्कृती', 'हिंदू संस्कृती', 'अभिजन संस्कृती', 'जनवादी संस्कृती', 'इजिप्तिशियन संस्कृती', 'सिंधू संस्कृती', 'मध्यमवर्गीयांची संस्कृती', 'मराठी लोकांची संस्कृती', 'आदिवासी संस्कृती', 'साधुसंतांची संस्कृती', वारकरी संस्कृती, 'मानवी संस्कृती', 'देण्याची संस्कृती', 'नववसाहतवादी संस्कृती', 'देशी संस्कृती' इत्यादी वा शब्दप्रयोगात, 'प्रदेश देश, वर्ग, व्यवसाय, स्थान, वृत्ती, स्वभाव, मूल्ये वगैरेंचा विशेष उल्लेख आहे. 'वर्ग-जाती-धर्म-प्रदेश' अशा विशिष्टतेचा निर्देश मिळतो.
आचार्य विनोबा भावे म्हणतात, भूक लागणे म्हणजे प्रकृती. भुकेने तृप्त झाल्यानंतर आणखीन खाणे (पशुपक्ष्यात ही वृत्ती नसते) म्हणजे विकृती आणि एका भाकरीची भूक असताना केवळ अर्धी भाकरी खात असताना, आपल्याहीपेक्षा जास्त भुकेला माणूस आपल्यासमोर आलेला आहे, त्या वेळी आपल्या अर्ध्या भाकरीतून चतकोर त्याला देणे म्हणजे संस्कृती.
प्रकृती-विकृती आणि संस्कृती अशा संकल्पना या व्याख्येतून मिळतात. प्रकृतीच्या विरुद्ध जाऊन केलेला हस्तक्षेप ही विकृती. प्रकृतीत मूल्यात्मक भर घालण्याच्या कृतीला, विचारसरणीला - मूल्यवान जीवनसरणीला संस्कृती असे विनोबा सुचचतात. मानवी जीवन आणि जीवनदृष्टी अधिक मूल्यवान करणे, उदात्त करणे, आदर्श घडवणे म्हणजे संस्कृती होय.
संस्कारपूर्ण, संस्कारमय जीवन जगण्याची देशकाल-विशिष्ट रीत म्हणजे संस्कृती. संस्कारमय-संस्कारपूर्ण' असे शब्द आले आहेत. उच्च दर्जाचे, आदर्श असे मूल्यवान जीवन, समाज-देश- काळ बांच्या अनुरोधाने चलित होणे, हे गृहीतक आहे. जगण्या-वागण्याची मूल्यवान उदात्त-जीवनपद्धती 'संस्कृती' म्हणून संबोधता येईल. 'संस्कृती म्हणजे काय?' या लेखात इरावती कर्वे यांनी संस्कृती संबंधी पुढीलप्रमाणे विचारचितन मांडले आहे.
जीवनात जी नवनिर्मिती होत असते ती मानव स्वतः करतो, तिचा सांभाळ करतो, ती नव्या पिढीपर्यंत पोहचवतो. अशाच जीवनाला संस्कारमय जीवन म्हणता येईल. संस्कृती ही समाजाची निर्मिती आहे. मनुष्य आपली सर्व भौतिक व मानसिक संपत्ती ठेवून जाती व ती पुढच्या पिढीला उपयोगी पडते. हेच संस्कृतीचे मुख्य बीज आहे.
माणसाचे मूळ पूर्वजांच्या संचयावर पोसते. त्याचा देह संचित द्रव्यावर पोसतो, तर त्याचे मन धर्म, रूढी, विज्ञान व मुख्य म्हणजे भाषा या संचित मनोद्रव्यावर पोसते. संस्कृतीची उत्पत्ती, जतन व संक्रमण भाषेच्या द्वारे होते. भाषा हे संस्कृतीचे एक प्रभावी अंग आहे.
संस्कृतीचे एक अंग दृश्य व हस्तग्राह्य असते. घरे, कपडेलत्ते,खाण्यापिण्याचे पदार्थ हे डोळ्यांनी दिसतात, हातांत धरता येतात किंवा चाचपून पाहता येतात. संस्कृतीचे दुसरे अंग असे ज्ञानेंद्रियांच्या द्वारा दाखवण्यासारखं व पाहण्यासारखे नाही; ते बुद्धिगम्य आहे. हे अंग म्हणजे मनुष्याने सामाजिक जीवन जगण्याची बांधून दिलेली रीत होय. एकमेकांशी वागावं कसं, संघटित जीवन (कुटुंब म्हणून, जात म्हणून, राष्ट्र म्हणून) जगावं कसे, याचे ठरावीक साचे असतात. त्याचप्रमाणे धर्म नीतिमत्ता याबद्दलही ठरावीक कल्पना असतात. योग्य-अयोग्य, या न्याय अन्याग्य, धार्मिक आध्यात्मिक, पाप-पुण्य, देव-राक्षस, ईश्वर व सृष्टी या सर्व कल्पना परंपरेने आलेल्या आहेत व व्यक्ती त्या थोड्याचहुत प्रमाणात आत्मसात करते.मनुष्यनिर्मित पदार्थभय जग व कल्पनामय जग म्हणजे संस्कृती. कोणतीही संस्कृती स्थिर व अचल नसते. काही कालखंडात मोठे फरक पडतात, तर एरवी हळूहळू संस्कृती बदलत असते. व्यक्त्ती ज्या समाजात जन्मते, त्या समाजातील संस्कार उचलते. संस्कृती सगळ्या इंद्रियांना कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये व बुद्धी यांना वळण लावते. व्यक्ती ज्या समाजात जन्माला येते, त्या समाजाचे सांस्कृतिक चळण ती उचलते. कोणत्याही समाजाची संस्कृती काय आहे, हे ठरवायचे झाल्यास त्यातील व्यक्तींच्या जीवनक्रमाचे सुक्ष्म परीक्षण कराने लागते व बऱ्याच व्यक्तींना साधारण असे आचारविचारांचे रूप करून त्याला संस्कृती हे नाव द्यावे लागते. बाड्मय, धर्म, तत्त्वज्ञान ही सर्व संस्कृतीची अंगे असतात असे नव्हे, तर तिला ती उचलून धरीत असतात.व्यक्ती विशिष्ट संस्कृतीत जन्मते. त्या वातावरणात वाढते व बुद्धीची वाढ व्हावयाच्या आतच त्या संस्कृतीची मूल्ये आत्मसात
संस्कृती बदलत जाते. म्हणजे बदल झाला की, संस्कृती बिघडली असे नव्हे. काही बदल चांगल्यासाठी होतात, काही बाईटासाठी होतात.संस्कृती म्हणजे देह, इंद्रिये च बुद्धी यांना लावलेले वळण-शिक्षण आहे.
प्रत्येक संस्कृतीची विशिष्ट रचना असते. तिच्यात सर्व सामाजिक संस्था एकमेकींत गुंफलेल्या असतात. त्या एकमेकींवर अवलंबूनही असतात. त्यांच्यापैकी एका घटकसंस्थेत बदल झाला की, त्याचा परिणाम इतर घटक संस्थांवर होतो. भिन्न संस्कृती परस्परांच्या सान्निध्यात आल्यावरही त्यांच्यात प्रथम संघर्ष सुरू होतो. पुढे त्या परस्परांत देवघेव करू लागतात. शेवटी त्या दोघींचे मिळून एक नवेच स्वरूप उदयास येते.
भारतीय संस्कृतिकोशातील 'संस्कृती' या संकल्पनेचे विविरण पाहता लक्षात येते की, भौतिक संस्कृती व मनोमय / आध्यात्मिक संस्कृती असे दोन स्तर आहेत. संस्कृती जगण्यातही उन्नयनशील, प्रकाशदायी, उन्नत, आदर्श जीवनप्रणाली ठरते. मानवी समाजाची ती परंपरागत निर्मिती असते.देश-काल-परिस्थितिनुरूप मानवी कल्याणाच्या, सहजीवनाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने ती बदलत असते.
'चांगले-आदर्श-पवित्र-उदात्त' अशी मूल्यसंस्कारावर आधारलेली 'संस्कृती' ही संकल्पना आहे. भारतीय संस्कृतीकोशकारांनी तिला आध्यात्मिकतेचा, उच्च जीवनमूल्यांच्या अनुसरणाचा अर्थ प्रदान केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, संमिश्रता प्रभाव, देवघेव, बहुसांस्कृतिक अस्तित्व यांचाही निर्देश या नोंदीत मिळतो. संस्कृती' म्हणजे कला, विचारसंबद्ध जीवन आणि मूल्याधारित जीवन जगण्याची रीत, असा घेता येईल.
'संस्कृती' म्हणजे प्रत्येक समाजाची जीवन जगण्याची विशिष्ट रीत होय. सामाजिकता हाच संस्कृतीचा उगम आहे.
संस्कृती ही मूल्याधारित समाजरचना असते. मूल्यांशिवाय संस्कृती फक्त रोबोंच्या जगातच संभवते. जगण्याच्या आपल्या अनुभवातून आपल्या भावी जीवनाच्या आशा-आकांक्षांची सांगड घालताना जे काही स्थान देणे म्हणजे मूल्यांची निर्मिती आणि प्रस्थापना करणे. त्या मूल्यांचे सेंद्रिय संकुल, संपूर्ण व्यवस्था म्हणजे त्या संस्कृतीची नीतिमूल्यांच्या परिस्थिती सापेक्षतेने नीती बदलत राहते.
साने गुरुजी यांनी 'भारतीय संस्कृती' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत भारतीय संस्कृतीची काही वैशिष्ट्ये नोंदवली आहेत. "वर्थ्यांच्या सत्याग्रहाश्रमातील आचार्य पूज्य विनोबाजी यांचे अनेक मौल्यवान विचार या पुस्तकात आले आहेत. कर्म, ज्ञान, भक्ती, कर्मफलत्याग, अहिंसा वगैरे प्रकरणांत त्यांच्यापासून जे भक्तिप्रेमात ऐकले, ते सारांशाने मी लिहिले आहे."
भारतीय संस्कृती हृदय व बुद्धी यांची पूजा करणारी आहे. उदार भावना व निर्मळ ज्ञान यांच्या योगाने जीवनास सुंदरता आणणारी ही संस्कृती आहे. ज्ञान-विज्ञानास हृदयाची जोड देऊन संसारात मधुरता पसरू पाहणारी ही संस्कृती आहे. भारतीय संस्कृती म्हणजे कर्म-ज्ञान-भक्तीचा जिवंत महिमा-शरीर, बुद्धी व हृदय यांना सतत सेवेत झिजविण्याचा महिमा.
भारतीय संस्कृती म्हणजे सहानुभूती, भारतीय संस्कृती म्हणजे विशालता, भारतीय संस्कृती म्हणजे सत्याचे प्रयोग. भारतीय संस्कृती म्हणजे स्थाणू न राहता सारखे ज्ञानाचा मागोवा घेत पुढे जाणे. जगात जे जे काही सुंदर, शिव व सत्य दिसेल ते ते घेऊन बाढणारी ही संस्कृती आहे. जगातील सारे ऋषी-महर्षी ती पूजील. जगातील सर्व संतांना ती बंदील, जगातील सर्व धर्मस्थापकांना ती आदरील. मोठेपणा कोठेही दिसो, भारतीय संस्कृती त्यांची पूजा करील. आदराने व आनंदाने त्यांचा संग्रह करील. भारतीय संस्कृती संग्राहक आहे. ती सर्वांना जवळ घेणारी आहे.
भारतीय संस्कृती म्हणताच सागर व अंबर या दोन वस्तू माझ्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. प्रकाश व कमळ या दोन दिव्य वस्तू डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्याग, संयम, वैराग्य, सेवा, प्रेम, ज्ञान, विवेक या गोष्टी आठवतात. भारतीय संस्कृती म्हणजे सान्तातून अनन्ताकडे जाणे, विरोधातून विकासाकडे जाणे, विकारातून विवेकाकडे जाणे. भारतीय संस्कृती म्हणजे मेळ, सर्व धर्मांचा मेळ, सर्व जातींचा मेळ, सर्व ज्ञानविज्ञानांचा मेळ होय.
✍️ डॉ अजितकुमार पाटील, कोल्हापूर.
( लेखक : मराठी साहित्याचे पीएच डी धारक आहेत )