शिवाजी मार्केट फेरीवाला सर्वेक्षण: मुदतवाढ व फॉर्म वाटपासाठी स्वतंत्र व्यवस्था करा : नगरसेवक आश्किन आजरेकर
schedule07 Oct 26 person by visibility 165 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय क्र. २ अंतर्गत सुरू असलेल्या फेरीवाला सर्वेक्षण २०२६ च्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी आणि प्रचंड गर्दीमुळे फेरीवाल्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बिकट परिस्थिती लक्षात घेता, अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीत वाढ करावी आणि सुरळीत कारभारासाठी फॉर्म वाटपाची स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात यावी, अशी आक्रमक मागणी शिवसेना नगरसेवक आश्किन गणी आजरेकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.
शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयात सध्या फेरीवाल्यांची कागदपत्रे तपासणी आणि बायोमेट्रिक नोंदणीसाठी प्रचंड गर्दी होत आहे. कार्यालयाकडून संध्याकाळी ४:०० वाजेनंतर येण्याच्या सूचना दिल्याने उपलब्ध वेळेत सर्व पात्र फेरीवाल्यांची प्रक्रिया पूर्ण होणे अशक्य बनले आहे. परिणामी, अनेक पात्र फेरीवाले वेळेत अर्ज सादर न करू शकल्यामुळे हक्काच्या रोजगारापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने मुदतवाढ द्यावी आणि फॉर्म वाटपाची स्वतंत्र यंत्रणा राबवून सर्वसामान्य फेरीवाल्यांना त्वरित दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी नगरसेवक आश्किन आजरेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.