SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
एस.टी. महामंडळाच्या सवलतीच्या पाससाठी गावागावात कॅम्प आयोजित करा; करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुळकुड दुर्घटनेतील मृत शर्विलच्या घरी मंत्री हसन मुश्रीफ यांचे सांत्वन; फाऊंडेशनकडून ५१ हजारांची आर्थिक मदत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विश्वात्मक दृष्टीचे प्रगल्भ विचारवंत: डॉ. श्रीपाल सबनीसपश्चिम महाराष्ट्रात वारणा विद्यापीठाच्या कोरे अभियांत्रिकीस सर्वाधिक प्रवेश जागामहाडायलिसिस सेवेमुळे किडनी रुग्णांना मोठा दिलासा मिळणार : आमदार यड्रावकर; शिरोळ ग्रामीण रुग्णालयात महाडायलिसिस सेवा सुरू हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कौशल्य, सेवाभाव महत्त्वाचा : डॉ. शर्माऐतिहासिक निर्णय : शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी प्रॅक्टिस बंदी कायमउत्तर ध्रुवाचा पाण्याचा तळ सर करणारी पहिली अण्वस्त्र पाणबुडी: 'यूएसएस नॉटिलायस'व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय चालवणारा मुख्य फरार आरोपी करवीर पोलिसांच्या जाळ्यातजयसिंगपूर येथे वित्तीय जागरूकता व साक्षरता कार्यक्रम संपन्न

जाहिरात

 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विश्वात्मक दृष्टीचे प्रगल्भ विचारवंत: डॉ. श्रीपाल सबनीस

schedule03 Aug 26 person by visibility 110 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : बहुसांस्कृतिक जाणीवा असणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे विश्वात्मक दृष्टीचे साहित्यिक होते, तसेच प्रगल्भ आणि परिपक्व विचारवंत म्हणूनही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची सांस्कृतिक भूमिका’ या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना ते आज बोलत होते. कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते.

अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा आणि विचारांचा व्यापक पट उलगडताना सबनीस यांनी त्यांना केवळ शाहिर किंवा लोककलावंत म्हणून मर्यादित न पाहता, समतेचा, स्वातंत्र्याचा आणि मानवतावादाचा साक्षेपी विचार मांडणारा विश्वात्मक दृष्टीचा साहित्यिक म्हणून अधोरेखित केले. ते म्हणाले, अण्णा भाऊंच्या लेखणीमध्ये शोषण, जातिव्यवस्था, भांडवलशाही, ब्राह्मण्य आणि विषमतावादी व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष दिसून येतो; मात्र त्याचबरोबर त्यांच्यात संवादशीलता, समन्वयशीलता आणि सर्वसमावेशकताही होती. मार्क्स, आंबेडकर, फुले, शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर, तुकडोजी महाराज अशा विविध वैचारिक-सांस्कृतिक प्रवाहांचे संचित त्यांनी आत्मसात केले होते. अण्णा भाऊंच्या कादंबऱ्या, शाहिरी, वगनाट्य आणि लोकनाट्यांमधून महाराष्ट्र, भारत आणि विश्वमानवतेचा व्यापक विचार व्यक्त होतो. त्यांचे साहित्य हे केवळ दलित किंवा एका जातीपुरते मर्यादित नसून सर्वसमावेशक, बहुसांस्कृतिक आणि जागतिक मूल्यांचे प्रतिनिधित्व करणारे आहे, असे सबनीस यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यविश्वाचा अभ्यास करताना त्यांच्या लेखनातील लोकजीवनाची खोल जाण, सामान्य माणसाविषयीची आस्था आणि सामाजिक वास्तवाचे तटस्थ चित्रण प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या कथांमधून केवळ दुःख, दारिद्र्य किंवा संघर्षच नव्हे, तर माणूसपणावरचा अढळ विश्वास आणि परिवर्तनाची उमेदही व्यक्त होते. आजच्या काळात अण्णा भाऊंच्या विचारांची अधिकाधिक गरज असून त्यांच्या साहित्याचा अभ्यास समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. अण्णा भाऊंनी मांडलेली समतेची, बंधुत्वाची आणि न्यायाची भूमिका ही नव्या पिढीला दिशा देणारी असून, त्यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते न राहता आचार-विचारांना प्रेरणा देणारे जीवनमूल्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, महामानवांची जातीजातींत वाटणी होणे गैर असून केवळ अस्मिता म्हणून त्यांना मिरविण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा गांभीर्यपूर्वक स्वीकार केला जाणे आवश्यक आहे. अण्णा भाऊ साठे यांनी लौकिकार्थाने शिक्षण नसतानाही निसर्गवाचन, परिसर वाचन, माणसांचं वाचन, वास्तव जीवनातील चटके आणि अनुभव यांच्यावर चिंतन केले. जागतिक साहित्याचे वाचन केले. त्यातून त्यांच्यात लेखन प्रेरणा जागल्या आणि वास्तव, आदर्श व त्यांच्या स्वप्नातील समाज यांचा मेळ घालत त्यांनी साहित्य निर्मिती केली. हा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

🟣 ‘अण्णा भाऊंचा सांस्कृतिक हस्तक्षेप मौलिक’
उद्घाटन सत्रानंतर झालेल्या परिसंवादात अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून तत्कालीन अभिजन सांस्कृतिक जाणीवांमध्ये जो हस्तक्षेप केला, तो अत्यंत मौलिक स्वरुपाचा होता. त्यामुळे साहित्याच्या मुख्य प्रवाहामध्ये दलित, शोषितांचा आवाज बुलंद झाला, असा सूर निघाला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीष मोरे होते.

 परिसंवादात डॉ. मेघा पानसरे यांनी ‘अण्णा भाऊंचे आंतरराष्ट्रीयत्व’, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी ‘अण्णा भाऊंच्या साहित्यातील फुले-आंबेडकरी जाणीवा’ आणि डॉ. अंबादास सकट यांनी ‘महाराष्ट्राचे शेक्सपिअर अण्णा भाऊ साठे’ या विषयांवर मांडणी केली.

यावेळी अनिकेत कांबळे या विद्यार्थ्याने अण्णा भाऊ साठे यांना रॅप साँगद्वारे आभिवादन केले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. अक्षय सरवदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शुभदा पाटील यांनी परिचय करून दिला. मनीषा कदम-देसाई, सरिता बनके यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रभंजन माने यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. ललिता सबनीस, डॉ. किसनराव कुराडे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. शरद गायकवाड, डॉ. मच्छिंद्र गोेफणे, डॉ. कबीर दास, डॉ. उत्तम सकट, डॉ. नीलेश बनसोडे, विलास सोयम, अनिल म्हमाणे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes