कोल्हापूर महानगरपालिकेसाठी सरासरी ६६.५४ टक्के मतदान, इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी ६९.७६ टक्के मतदान; आज निकाल
schedule16 Jan 26 person by visibility 120 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या दहाव्या सार्वत्रिक निवडणुकीत गुरुवारी सरासरी ६६.५४ टक्के मतदान झाले, तर इचलकरंजीच्या पहिल्याच महापालिका निवडणुकीसाठी ६९.७६ टक्के मतदान झाले. आज शुक्रवारी सकाळी मतमोजणी होणार असून दुपारी बारापर्यंत निकाल अपेक्षित आहे .
कोल्हापुरात ८१ जागांसाठी ३२७ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस-उद्धवसेना आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. यापूर्वी लोकसभा, विधानसभेलाही कोल्हापूर राज्यात भारी राहिले आहे.
कोल्हापुरात सकाळी साडेसात वाजता शहरातील सर्वच ५९५ केंद्रांवरमतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला तासभर अत्यंत तुरळक मतदार केंद्रावर पोहोचले होते. केंद्रातील कर्मचारी चार मते कशी द्यायची हे मतदारांना सांगत होते. आवश्यकता वाटेल तेथे मदत करत होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला चार मत देताना गोंधळत होत्या. त्यामुळे मतदानाला वेळ लागत होता.
ज्या प्रभागात मोठी चुरस पहायला मिळत होती, त्या प्रभागातील मतदान केंद्रावर सकाळी साडेनऊ वाजल्यानंतर गर्दी व्हायला सुरुवात झाली. १५-२० मतदार रांगेत उभे राहिल्याचे पहायला मिळत होते. मतदानाची गती अतिशय संथ होती. सहा तास उलटल्यानंतर दुपारी दीड वाजता मतदानाची टक्केवारी सरासरी ३७ टक्के इतकी होती. दुपारी दोन वाजल्यानंतर तर ही गती पुन्हा कमी झाली. साडेतीन वाजता ५०.८५ टक्के मतदानाची नोंद झाली.
दरम्यान, इचलकरंजी महानगरपालिकानिवडणुकीसाठी चुरशीने ६९.७६ टक्के मतदान झाले. सकाळी पहिल्या दोन तासांमध्ये अत्यल्प मतदान झाले, तर सायंकाळी सर्वाधिक मतदानाची नोंद करण्यात आली. अनेक ठिकाणी केंद्र शोधताना मतदारांची दमछाक झाली. महापालिकेच्या निवडणुकीत ६५ जागांसाठी गुरुवारी शहरातील ३०२ मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरूच होते.