टाकाळा माळी कॉलनी येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत केली पाहणी
schedule11 Mar 26 person by visibility 123 categoryमहानगरपालिका
▪️तलावाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची केली मागणी
कोल्हापूर : कोल्हापूर मध्ये एकूण तीन जलतरण तलाव आहेत. अंबाई टॅंक, रमणमळा आणि राजारामपुरी येथील राजर्षी छत्रपती शाहू जलतरण तलाव यापैकी फक्त रमणमाळा येथील तलाव सुरळीत सुरू आहे. माळी कॉलनी येथील राजर्षी छत्रपती शाहू जलतरण तलाव 2003 रोजी सुरू झाला यावेळी ऑलिंपिक दर्जाचा तलाव अशी या तलावाची ओळख होती अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी सराव करत होते.
याविषयात आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत पाहणी करून तलावाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी केली.
या जलतरण तलावात ऑलिंपिक पुलक्षेत्र 1547.00 चौ.मी. लर्निंग पूल क्षेत्र 351.68 चौ.मी. व बेबी पूल 203.15 चौ.मी. आणि डायविंग क्षेत्र 22.50 चौ.मी असे एकूण क्षेत्र 2123.65 चौ.मी आहे. करवीर रि.स.नं. 382 व 383 पैकी जागेवरील राजर्षी शाहू जलतरण तलाव व सभोवतालचे एकूण क्षेत्र सुमारे 17294.40 चौ.मी आहे.
हा जलतरण तलावाला महासाभेचा ठराव क्रमांक 13 दिनांक 28/11/2014 रोजी मान्यता झाली असून स्थायी समितीचा ठराव क्रमांक 89 दिनांक 26/3/2015 रोजी संमत झाला आहे. यानुसार हा जलतरण तलाव खाजगी व्यवस्थापकांना चालवण्यास देण्यात आलेला आहे.
सदर तलावाच्या ठिकाणी राजारामपुरी परिसरामुळे आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिक, खेळाडू या ठिकाणी पोहण्यासाठी येत असत उन्हाळी सुट्टीत देखील या ठिकाणी लहान मुलांना पोहायला शिकवण्यासाठी अनेक पालक याचा उपयोग करत असत.
परंतु जून 2019 पासून आजतागायत गेली सहा वर्षे हा जलतरण तलाव बंद अवस्थेत आहे. तलावाची प्रचंड दुरावस्था झाली असून लिकेज अनेक ठिकाणी आहेत फरश्या फुटल्या आहेत. या जलतरण तलावाला अवकळा आली आहे. सध्या या ठिकाणी दूषित पाणी आणि जलपर्णी यांनी हा तलाव व्यापला आहे.
तरी या निवेदनाच्या माध्यमातून आमची आपणाकडे मागणी आहे की, कोल्हापूर महानगरपालिका व सदर ठेकेदार यांनी या जलतरण तलावाचे लिकेज व इतर दुरुस्ती अशी सर्व कामे त्वरित पूर्ण करून हा जलतरण तलाव सर्वसामान्य नागरिकांसाठी लवकरात लवकर खुला करावा.