कोल्हापूर : सीपीआरमधील औषधांचा तुटवडा आणि नूतनीकरण घोटाळ्याविरोधात बाळासाहेब बेलेकर आक्रमक, उपोषणाचा इशारा
schedule15 Oct 26 person by visibility 12 categoryआरोग्य
कोल्हापूर : एकीकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची औषधांसाठी धावपळ होत असताना, दुसरीकडे छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयासह ग्रामीण, उपजिल्हा व इचलकरंजीतील सामान्य रुग्णालयांच्या औषध भांडारात आवश्यक वैद्यकीय साहित्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. याप्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करून चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बेलेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच उपोषणाचा इशारा दिला.
पत्रकारांशी बोलताना बेलेकर यांनी आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. सीपीआर औषध भांडारात साडेसहा कोटी रुपयांचा निधी शिल्लक असतानाही औषधांची खरेदी का रखडली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्या रुग्णालयात उपचारासाठी आवश्यक असणारे नॉर्मल सलाईन, शुगर तपासणी पट्ट्या, जेलको, ग्लोव्हज, कॉटन रोल, बँडेज व चिकटपट्टी यांसारख्या अत्यंत मूलभूत साहित्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून गरीब रुग्णांना ते बाहेरून विकत घ्यावे लागत आहे.
संबंधित फार्मासिस्टच्या निलंबनाची मागणी
पूर्वी औषध भांडारात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांपूर्वी नियुक्त झालेले फार्मासिस्ट राम करले यांच्या कार्यकाळात औषध खरेदी प्रक्रियेत खोळंबा निर्माण झाल्याचा आरोप बेलेकर यांनी केला. औषध पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित फार्मासिस्टला तातडीने निलंबित करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
◼️लाखो रुपये खर्चून केलेल्या नूतनीकरणाची मोडतोड का?
यासोबतच, सीपीआर रुग्णालयाच्या अपघाती विभागाच्या नूतनीकरणावरही बेलेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेला वातानुकूलित विभाग आणि चांगल्या दर्जाचे फर्निचर अवघ्या सहा महिन्यांत तोडून रस्त्यावर फेकण्याची वेळ का आली? असा सवाल त्यांनी केला.
आरोग्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांच्या या गंभीर प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन या सर्व गैरप्रकारांची आणि उधळपट्टीची सखोल चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बाळासाहेब बेलेकर यांनी दिला आहे.