कोल्हापूरात विनापरवाना बांधकामावर महापालिकेची कारवाई ; तळघरातील बाथरूम, टॉयलेट्स हटवले
schedule28 Apr 26 person by visibility 111 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : सी वॉर्ड बिंदू चौक परिसरातील सि.स. नं. 525 येथील एम.के. टॉवर अपार्टमेंटमध्ये दिलीप आनंदराव मोरे यांनी मंजूर नकाशाव्यतिरिक्त जादा व विनापरवाना बांधकाम केल्यामुळे आज महानगरपालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत तळघरातील बाथरूम व टॉयलेट्सचे अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले असून उर्वरित कारवाई उद्या करण्यात येणार आहे.
या प्रकरणी अलका यशवंत माने यांनी दिलीप आनंदराव मोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 53(1) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. तसेच 15 जानेवारी 1999 रोजी मंजूर झालेल्या नकाशाव्यतिरिक्त केलेले बांधकाम 30 दिवसांत काढून टाकण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र संबंधितांनी अनधिकृत बांधकाम न हटवल्याने महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्त मागवून कारवाईचे नियोजन केले होते. पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने कारवाई रखडली होती.
दरम्यान, अलका माने यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या सूचनेनुसार महानगरपालिकेने आठ आठवड्यांत कारवाई करण्याचे मान्य केले होते. त्या अनुषंगाने आज पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले व उपशहर रचनाकार एन. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, पंकज जाधव, अदिती पोवार, मुकादम सचिन जाधव, पोलीस कर्मचारी व विभागीय कार्यालय क्र.2 कडील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.