घरफाळा वसुलीसाठी विशेष मोहिम राबवा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
schedule28 Apr 26 person by visibility 76 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिकेच्या घरफाळा विभागाने चालू आर्थिक वर्षातील वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तत्काळ वसुली वाढविण्याच्या सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. घरफाळा विभागाच्या वसुली कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दि. 1 मे 2026 ते 30 मे 2026 या कालावधीत घरफाळा विभागामार्फत विशेष मोहिम राबविण्यात यावी. या मोहिमेत ज्या मिळकतींना कर आकारणी झालेली नाही, ज्या मिळकतींमध्ये वाढीव क्षेत्र आहे किंवा वापरामध्ये बदल झालेला आहे अशा सर्व मिळकतींचा शोध घेण्यात यावा. नागरिकांनीही अशा मिळकतींबाबत महापालिकेकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या मोहिमेसाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी. चालू वर्षात 120 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या 6 टक्के सवलत योजनेची संबंधित अधिक्षक व वसुली लिपीकांनी व्यापक प्रसिद्धी करावी. या सवलतीच्या माध्यमातून 30 जून 2026 अखेर 50 ते 60 टक्के वसुली साध्य करण्याच्या सूचना दिल्या. घरफाळा विभागाचा दर 15 दिवसांनी आढावा घेतला जाईल. प्रत्येक बैठकीत वसुली लिपीकांकडून त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. चांगली वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा स्वतः सत्कार करण्यात येईल, तर अपुरी कामगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्तांनी यावेळी दिला.
कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात दररोज फिरती करून नव्या मिळकतींचा शोध घ्यावा. नगररचना विभागाच्या परवानग्यांची तपासणी करून संबंधित ठिकाणी घरफाळा लागू करावा. तसेच, प्रत्येक मालमत्ता धारकांचे मोबाईल क्रमांक संकलित करून त्यांना एसएमएस व व्हॉट्सअॅपद्वारे माहिती देण्याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, अधिक्षक अशोक यादव, दत्तप्रसाद माजगांवकर, अर्चना प्रभावळे तसेच वसुली लिपीक उपस्थित होते.