संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा केएलई युनिव्हर्सिटीमध्ये सर्वोत्कृष्ट प्रकल्प
schedule14 Jan 26 person by visibility 57 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, बेळगावी येथील संगणकशास्त्र (CSE) व संगणकशास्त्र (AI) विभागांच्या वतीने मंथन 2.0 – आंतरशालेय आयडिएथॉन व हॅकथॉन या प्रतिष्ठित स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सदर स्पर्धा दि. १० जानेवारी २०२५ रोजी केएलई विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत ८० हून अधिक शाळांमधील ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा अत्यंत चुरशीची व नवोन्मेषाला चालना देणारी ठरली.
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विभागातील संस्कृती आर. लांबटे व विश्वजीत डी. शिंदे या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “थर्डआय (ThirdEye)” या नाविन्यपूर्ण प्रकल्पाने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. शेतांमध्ये जंगली प्राण्यांची घुसखोरी ओळखून स्वयंचलित मोठ्या आवाजाच्या इशाऱ्यांद्वारे शेतकऱ्यांना सतर्क करणारी ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली असून ती शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे.
स्पर्धेत या प्रकल्पाने नाविन्य, उपयुक्तता व सामाजिक महत्त्व या निकषांवर सर्वोच्च स्थान मिळवत सर्वोत्कृष्ट प्रकल्प पुरस्कारासह ₹ ५,००० रोख रक्कम व चषक पटकावला.
या यशस्वी प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना श्री. संतोष हिरेमठ व सौ. साक्षी चौगुले यांचे सक्षम मार्गदर्शन लाभले. त्यांच्या तांत्रिक व शैक्षणिक सहकार्यामुळेच हा प्रकल्प यशस्वी ठरला.
या स्पर्धेचे परीक्षण डॉ. एस. एफ. पाटील (प्राचार्य), डॉ. प्रविण घोरपडे (अधिष्ठाता – शैक्षणिक), डॉ. मनीषा टापले (अधिष्ठाता – संशोधन व विकास), प्रा. गिरीधर ए. हेब्बाळे (अधिष्ठाता – विद्यार्थी कल्याण) आणि डॉ. राजश्री खनाई (विभागप्रमुख – CSE व CSE (AI)) यांनी केले.
या यशस्वी वाटचालीस अध्यक्ष मा. श्री. संजय घोडावत, विश्वस्त श्री. विनायक भोसले, संचालिका प्राचार्या. सस्मिता मोहंती, प्राचार्य नवीन महाबळेश्वर, उपप्राचार्या शोभा नवीन तसेच सर्व शिक्षक यांनी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचेअभिनंदन करत त्यांच्या नवकल्पनांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचा निर्धार व्यक्त केला.