कागल तालुक्यात माजी सैनिकाचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू
schedule18 Aug 24 person by visibility 243 categoryगुन्हे
मुरगूड : यमगे (ता. कागल) येथील माजी सैनिक अशोक बळवंत कोंडेकर (वय ६२) यांचा गाव तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पट्टीच्या पोहणाऱ्या माजी सैनिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रविवारी त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती. त्यासाठी ते सकाळी लवकर उठून त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गाव तलावामध्ये कमळाची फुले काढण्यासाठी गेले होते. त्यांना चांगले पोहता येत होते.
सकाळी सहाच्या सुमारास ते तलावामध्ये उतरले होते. तलावाच्या मध्यभागी जाऊन त्यांनी फुले काढली. परत पाठीमागे फिरून ते काठावर येण्यासाठी प्रयत्न करू लागले, पण त्यांचे पाय कमळाच्या वेली व केंदाळामध्ये अडकले. त्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. ते मोठं मोठ्याने ओरडत बुडाले होते. त्यावेळी काठावर असलेल्या लोकांनी त्यांना बाहेर काढून मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.