सांगली येथे मूर्ती विसर्जनावेळी दोघे बुडाले
schedule09 Sep 24 person by visibility 335 categoryगुन्हे
सांगली : नदी पात्रात मूर्ती विसर्जित करून कार्यकर्ते नदी पात्रातून बाहेर येताना तिघेजण पाण्यात बुडाले. यावेळी येथील एका मच्छिमाराने धाडसाने उडी घेऊन बुडणाऱ्या एकास बाहेर काढले. मात्र तोपर्यंत दोघे भोवऱ्यात अडकल्यामुळे दोघांना पात्राबाहेर येता आले नाही. ते दोघेजण बुडाले. शोधमोहिमेनंतर अंकली येथे अक्षय बनसे याचा मृतदेह शोधण्यात यश आले.
धरणातून पाणी सोडल्यामुळे पातळी वाढली असून पाण्याला वेग आहे. शिवाजी मंडईसमोरील वाल्मिक मित्र मंडळातर्फे प्रतिवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाची गणेशमूर्ती वर्षभर ठेवली जाते. त्यानंतर पुढील वर्षी ही मूर्ती विसर्जन करून नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे त्यामुळे गतवर्षाची गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते मूर्ती घेऊन सरकारी घाटावर सायंकाळी पाच वाजता आले होते. तेव्हा चार फुटाची मूर्ती घेऊन सहाजण नदीपात्रात उतरले होते.
मूर्ती नदी पात्रात काही अंतरावर सोडून कार्यकर्ते बाहेर पडताना तिघेजण पाण्यात बुडाले. त्यापैकी राज चव्हाण याला एका मच्छिमाराने उडी घेऊन बाहेर काढले. तर आदित्य राजपुरे आणि अक्षय बनसे हे पाण्याच्या भोवऱ्यात अडकून बुडाले.
दोघे युवक बुडाल्याचे समजताच महापालिका अग्निशमन दल, स्पेशल रेस्क्यू फोर्स, आयुष हेल्पलाईन, विश्वसेवा बोट क्लब यांनी नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतू ते मिळाले नाहीत. शोधमोहिमेनंतर अंकली येथे अक्षय बनसे याचा मृतदेह शोधण्यात यश आले.