१ कोटींहून अधिक किमतीचे ४०० हरवलेले मोबाईल नागरिकांच्या हातात; कोल्हापूर सायबर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!
schedule03 Sep 26 person by visibility 207 categoryगुन्हे
◼️तांत्रिक तपास आणि सीईआयआर पोर्टलच्या मदतीने एकाच महिन्यात शोध; नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे आपुलकीचे हसू!
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये हरविलेल्या मोबाईल संचांबाबत दाखल झालेल्या तक्रारींवर कारवाई करत, कोल्हापूर सायबर पोलीस व जिल्हा पोलिसांनी तब्बल १,००,२५,००० रुपये किमतीचे ४०० मोबाईल संच शोधून काढले आहेत. गहाळ झालेला मौल्यवान मोबाईल परत मिळण्याची कोणतीही खात्री नसताना, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते स्वतःचे मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड समाधान व्यक्त होत असून त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला.
कोल्हापूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत मोबाईल गहाळ झाल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सायबर पोलीस ठाणे व जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांना तांत्रिक तपास करून संयुक्त कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार संबंधित मोबाईल कंपन्यांशी संपर्क साधून तसेच 'सीईआयआर' (CEIR) पोर्टलचा प्रभावी वापर करून हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या होत्या.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी पोलीस उपनिरीक्षक अतिष म्हेत्रे आणि अंमलदारांचे विविध विशेष पथके तयार केली होती. या पथकांनी मागील एका महिन्याभरात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यांतून अथक प्रयत्न करून तब्बल १ कोटी २५ हजार रुपये किमतीचे ४०० मोबाईल संच जप्त करण्यात यश मिळवले.
आज दि. ०३ सप्टेंबर रोजी ज्या नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते, त्यांच्या कागदपत्रांची व मोबाईलची योग्य ती ओळख पटवून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते संबंधितांना त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले. हरवलेले मोबाईल सुरक्षितपणे परत मिळाल्यामुळे नागरिकांनी कोल्हापूर पोलिसांच्या कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस प्रशासनाकडून भविष्यातही अशा प्रकारची मोहीम सतत राबविण्यात येणार असून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जास्तीत जास्त नागरिकांचे मोबाईल शोधून त्यांना परत देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.