कोल्हापूर महापालिकेच्यावतीने अग्निशमन सेवा दिन साजरा
schedule14 Apr 24 person by visibility 281 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : दिनांक 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई गोदीत एस. एस. फोर्ट स्टिकिंन या जहाजाला स्फोट होवून लागलेल्या भीषण आगीशी झुंज देताना अग्निशमन दलाच्या 66 जवानांना हौत्यात्म्य प्राप्त झाले तसेच त्यानंतरही अग्निशमनाचे कार्य करतांना प्राणाची आहुती देणाऱ्या अग्निशमन सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ तसेच जनतेमध्ये अग्निशमनबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी प्रतिवर्षी केंद्रीय गृह मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार संपूर्ण देशात दिनांक 14 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो.
अग्निशमन सेवा दिनानिमित्त सासने ग्राऊंड येथे महापालिकेच्यावतीने अग्निशमन केंद्रात अग्निशमन सेवा बजावत असताना प्राणाची आहुती देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानवंदना, श्रध्दांजली व पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी फायर गीत गाऊन हुताम्यांना श्रध्दाजंली वाहण्यात आली. यानंतर शहरामधुन अग्निशमन सप्ताहनिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. ही रॅली कावळानाका, व्हिनस कॉर्नर, लक्ष्मीपूरी, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पूतळा व महापालिका चौक या शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये अग्नि सुरक्षा सुनिश्चित करा, राष्ट्र उभरणीत योगदान भरा, अशा घोषणा देण्यात आल्या.
अग्निशमन सेवा सप्ताहनिमीत्त दिनांक 14 एप्रिल ते 20 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडील शहीद जवान यांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्र हायस्कुल, मेन राजाराम हायस्कुल, विक्रम हायस्कुल, छत्रपती राजाराम हायस्कुल या प्राथमिक शाळांमध्ये अग्निशमनाचे प्रात्याक्षिके दाखविण्यात येणार आहे.
यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभीसे, स्थानक अधिकारी कांता बांदेकर, दस्तगीर मुल्ला, जयवंत खोत, ओंकार खेडकर व अग्निशमन दलाचे जवान व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.