मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून स्ट्राँगरुम व चार क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची पाहणी
schedule01 Jan 26 person by visibility 51 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त तथा मुख्य निवडणूक निरीक्षक श्रीमती शीतल तेली-उगले आणि सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक गणेश निऱ्हाळी यांनी रमणमळा येथील स्ट्राँगरुम तसेच चार क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची पाहणी केली.
यावेळी प्रशासक तथा निवडणूक निर्णय अधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने निवडणूक प्रक्रियेसाठी करण्यात आलेल्या तयारीची सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच चारही क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे व छाननी प्रक्रियेबाबतची माहिती निरीक्षकांनी घेतली.
मुख्य निवडणूक निरीक्षकांनी रमणमळा येथील स्ट्राँगरुम, महासैनिक दरबार हॉल, व्ही. टी. पाटील सभागृह, दुधाळी पॅव्हेलियन व गांधी मैदान येथील चार क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये व संपूर्ण निवडणूक यंत्रणेची पाहणी केली.
रमणमळा येथील स्ट्राँगरुमच्या पाहणीदरम्यान सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, परिसर व प्रवेश मार्ग पूर्णतः बंदिस्त करणे, बाहेरील स्क्रिनची व्यवस्था करणे, मतमोजणीचे नियोजन काटेकोरपणे करणे, आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवणे तसेच आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या.
क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान दाखल अर्जांच्या छाननी प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. तसेच मतमोजणीसाठी नेमण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणे, मतमोजणी यंत्रांच्या हाताळणीसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सूचना करण्यात आल्या. राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील सभागृहातील माध्यम कक्षाची पाहणी करताना सोशल मिडिया, पेड न्यूज व जाहिराती याबाबत माहिती घेऊन प्रचार कालावधी संपल्यानंतर जाहिराती व सोशल मिडियावर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे आदी अधिकारी उपस्थित होते.





