सेवा नियमावलीचे काम पूर्ण करून पदभरती करा; 'आप'चे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन
schedule15 Oct 24 person by visibility 311 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या अठराशेहुन अधिक जागा रिक्त आहेत. मंजूर पदांपैकी केवळ पन्नास टक्के कर्मचारी असल्याने शहरातील आरोग्य, रस्ते, अतिक्रमण निर्मूलन, कर वसुली, उद्यान देखरेख, जन्म-मृत्यू नोंद यासारख्या कामावर त्याचा परिणाम होत आहे. तसेच अपुऱ्या मनुष्यबळामुळे कर्मचारी तणावाखाली काम करत आहेत.
यासाठी नवीन आकृतीबंधाप्रमाणे पदभरती करणे आवश्यक आहे. परंतु महापालिका प्रशासनाने अद्याप सेवा नियमावली (सर्व्हिस रुल्स) बनवून त्याची तपासणी नगरविकास खात्याकडून त्याची मंजुरी घेतलेली नाही. गेल्या तीन महिन्यांपासून हे काम जैसे-थे परिस्थितीत आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारावर एकूण बजेटच्या पस्तीस टक्के एवढीच रक्कम खर्च करण्याच्या अटीमुळे नवीन पदभरती गेली अनेक वर्षे रखडली आहे.
त्यामुळे सेवा नियमावली त्वरित बनवून ती मंजुरीसाठी पाठवावी, तसेच पस्तीस टक्क्यांची अट पूर्ण करण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन निधीची मागणी करावी असे निवेदन आम आदमी पार्टीने आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना दिले.
यावेळी आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, समीर लतीफ, दुष्यंत माने आदी उपस्थित होते.