मठाधिपर्तीच्या निधनाच्या विरहातून दोघांची आत्महत्या; आंबा घाटातील दरीतून मृतदेह काढले
schedule18 Aug 24 person by visibility 324 categoryगुन्हे
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील आंबा घाट येथे गोरंबे येथील मठाधिपतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने दरीत उडी घेऊन दोघा मित्रांनी आत्महत्या केली. प्रशांत श्रीरंग सातवेकर (वय १९, रा. निपाणी) व स्वरूप दिनकर माने (वय २४, रा. कवठेपिरान ता. मिरज जि. सांगली) अशी त्यांची नांवे आहेत.
दोघानी मिळून आंबा घाटातील अडीचशे फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती साखरपा पोलिसांना लागली. त्यानुसार त्यांना दरीतून वर काढण्यासाठी शनिवारपासून रेस्क्यू टीम प्रयत्न करत होती. त्यांचे मृतदेह रविवारी दुपारी तीनच्या सुमारास वरती काढण्यात यश मिळाले. या घटनेची नोंद साखरपा पोलिसात झाली आहे.
शनिवारी वन विभागाचे कर्मचारी आंबा जंगल परिसरात गस्तीसाठी गेले होते. त्यांना दरीच्या काठावर रस्त्यावर मोटारसायकल (एमएच १०, डी. जे.२०२३) उभी असल्याचे निदर्शनास आले. वन कर्मचाऱ्यांनी ही माहिती शाहवाडी व साखरपा पोलिसांना दिली. पोलीस पथकांनी शोध घेतला असता सडा पॉईंट नावाच्या अडीचशे फूट खोल दरीत दोन मृतदेह निदर्शनास आले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी शनिवारी प्रयत्न सुरू असतानाच मुसळधार पाऊस, धुके यामुळे अडथळा निर्माण झाल्याने शनिवारी ही मोहीम थांबवण्यात आली होती. रविवारी सकाळी शोधमोहीम पुन्हा सुरू करून दुपारी तीनच्या सुमारास मृतदेह वरती काढण्यात आले. दोघांचेही घरातील लोकांनी ओळख पटल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
सुशांत यांनी पावस येतील मठात साधनेसाठी जाणार आहे, अशी माहिती फोनवरून घरच्यांना कळवली होती. त्यानंतर त्यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क न झाल्याने त्यांच्या घरच्यांनी १४ ऑगस्ट रोजी कागल पोलीस ठाण्यात गोरंबे येथील मठातील दोन युवक बेपत्ता असल्याची नोंद केली होती. या नोंदीच्या आधारे शाहूवाडी पोलिसांनी कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्याशी संपर्क साधला. मृत स्वरूप माने व सातवेकर हे दोघे बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शाहूवाडी पोलिसांनी कागल पोलीस व त्यांच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलवले व आज दुपारी रेस्क्यू टीमच्या साह्याने मृतदेह वरती काढून मृतदेहांची ओळख पटवून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.