कोल्हापुरात दररोजचा पाणीपुरवठा पूर्ववत; मात्र वेळेत अर्धा तास कपात
schedule04 May 26 person by visibility 113 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कडक उन्हाळ्यामुळे काळम्मावाडी धरण येथील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, तसेच एल निनोच्या प्रभावामुळे कमी पर्जन्यमानाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरविण्यासाठी महानगरपालिकेने मंगळवार दि.5 मे 2025 पासून पाणीपुरवठ्याबाबत नव्याने नियोजन केले आहे.
महानगरपालिकेकडून यापूर्वी पुईखडी जलशुद्धीकरण केंद्र येथून पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला तसेच चंबुखडी बैठी टाकी येथून वितरण होणाऱ्या भागाला एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, या नियोजनाची चाचणी घेतल्यानंतर मुख्य वितरण नलिका पूर्णपणे रिकाम्या राहत असल्याने त्या पुन्हा भरण्यास विलंब होत होता. परिणामी नियोजित वेळापत्रकानुसार दैनंदिन पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारी व लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेत आज लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात चर्चा झाली. त्यानुसार शहर तसेच सलग्न उपनगरांमध्ये मंगळवार, दिनांक 5 मे 2026 पासून पूर्ववत दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र, निर्धारीत वेळेत अर्धा तास कपात करून पाणीपुरवठा केला जाणार आहे. भविष्यात उपलब्ध पाणीसाठा, उन्हाळ्याचा कालावधी तसेच पावसाळा लांबल्यास आवश्यकतेनुसार अर्धा तासापेक्षा अधिक वेळ कपात करून दैनंदिन पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार असलेचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
तरी नागरीकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.