‘गोकुळ’मार्फत डॉ. चेतन नरके यांचा सत्कार
schedule28 Oct 25 person by visibility 115 categoryउद्योग
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाचे संचालक डॉ.चेतन अरुण नरके यांची महाराष्ट्र राज्याचा नवीन सहकार धोरण समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार गोकुळ परिवारच्यावतीने संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्यात आला.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रीय सहकार धोरण २०२३ मधील शिफारसीचा अभ्यास करून राज्याच्या दृष्टीने सहकार धोरण ठरवणेसाठीच्या महाराष्ट्र राज्याच्या समितीवर डॉ. चेतन नरके यांची नियुक्ती होणे संघाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. डॉ. नरके यांना त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सत्काराला प्रतिसाद देताना डॉ. चेतन नरके यांनी सांगितले की, “गोकुळ परिवाराकडून मिळालेल्या सत्काराबद्दल मनःपूर्वक आभार. हा सन्मान मला फक्त वैयक्तिक नाही तर आपल्या संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी मिळालेला आहे असे वाटते. महाराष्ट्र राज्याच्या नवीन सहकार धोरण समितीवर मला नियुक्त करून मला सहकार क्षेत्रातील कार्य अधिक परिणामकारकपणे पुढे नेण्याची संधी दिली गेली आहे. यासाठी मला माझ्या सहकाऱ्यांचे आणि गोकुळचे योगदान नेहमीच मार्गदर्शन करणारे राहिले आहे. भविष्यातही मी सहकार क्षेत्रातील प्रत्येक सदस्यांसाठी कार्य करण्यास कटिबद्ध आहे.”
तसेच यावेळी कोल्हापूर जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने, गोकुळ दूध संघाने अलीकडेच गाय व म्हैस दूध खरेदी दरात वाढ, तसेच संस्था कमिशनमध्ये प्रति लिटर १० पैसे, सचिव कमिशनमध्ये ५ पैशांची वाढ, आणि महालक्ष्मी पशुखाद्याच्या दरात ५० रुपयांची कपात केल्याबद्दल संघाचे चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.