गोकुळकडून लवकरच ‘गोकुळ केसरी कुस्ती’ स्पर्धा पुन्हा सुरू : नविद मुश्रीफ
schedule28 Oct 25 person by visibility 159 categoryउद्योग
कोल्हापूर : जिल्ह्यातील परंपरागत कुस्ती संस्कृतीला गोकुळ दूध संघाने नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. काही वर्षांपासून बंद असलेली ‘गोकुळ केसरी कुस्ती’ स्पर्धा आता गोकुळ मार्फत पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिली.
संचालक मंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा होवून निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यापूर्वी गोकुळच्या वतीने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या. मात्र काही कारणांमुळे मागील काही वर्षांपासून या स्पर्धांना विराम मिळाला होता. अलीकडे कोल्हापुरातील विविध तालीम संघटनांचे पदाधिकारी, मल्ल व कुस्तीप्रेमी यांनी संघाचे संचालक, नेतेमंडळी आणि चेअरमन यांची भेट घेऊन स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणुकीचा कालावधी संपल्यानंतर लगेचच या स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. गोकुळच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुण पिढीला परंपरागत कुस्ती खेळाकडे आकर्षित करून या मातीतून नव्या मल्लांना घडविण्याचा हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले. कुस्ती हा कोल्हापूरच्या परंपरेचा अविभाज्य भाग असून, गोकुळच्या माध्यमातून या खेळाला नवे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.