मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली-उगले यांची माध्यम कक्षाला भेट
schedule01 Jan 26 person by visibility 62 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली-उगले यांनी राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील सभागृहात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षाला भेट दिली. त्यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली आणि आवश्यक सूचना दिल्या.
माध्यम कक्षाची पाहणी करताना शीतल तेली-उगले यांनी सोशल मीडिया, पेड न्यूज तसेच जाहिरातींशी संबंधित व्यवस्थेची माहिती घेतली.
प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर, म्हणजे दिनांक १३ जानेवारी २०२६ सायंकाळी ५.३० वाजल्यापासून ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत (१५ जानेवारी २०२६ पर्यंत) जाहिराती आणि सोशल मीडिया पोस्ट्सवर विशेष लक्ष ठेवण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या (एमसीएमसी) कामकाजाचीही बारकाईने तपासणी केली. निवडणूक माध्यम कक्षाच्या एकूण कामकाजाबाबत सविस्तर सूचना देताना, पेड न्यूजच्या प्रकरणांवर तात्काळ कारवाई करण्याचे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर होणाऱ्या प्रचारावर सतत नजर ठेवण्याचे आदेश दिले. यावेळी प्रशासक तथा मुख्य निवडणूक अधिकारी के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी मोहन सूर्यवंशी उपस्थित होते.





