पोलीस प्रशासनाचा 'खाक्या'! हुपरीतील "एस. एम. बॉईज गॅग" टोळीवर हद्दपारीचे अस्त्र; एका वर्षासाठी कोल्हापूर जिल्हाबंदी
schedule23 Mar 26 person by visibility 128 categoryगुन्हे
कोल्हापूर : जिल्हयातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या आणि सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून हुपरी परिसरातील कुख्यात 'एस. एम. बॉईज गँग'च्या टोळी प्रमुखासह १० सदस्यांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिले आहेत.
हुपरी आणि हातकणंगले परिसरात या टोळीने आपल्या गुन्हेगारी कृत्यांनी दहशत माजवली होती. टोळी प्रमुख सागर शरद माळी याच्यासह शोएब रियाज मुल्ला, शाहरुख मैनुद्दीन मुजावर, शुभम उमेश घोरपडे, साईराज सुनील गजरे, मोहीन मैनुद्दीन मुजावर, अक्षय अनिल मोडीकर, रोहित उर्फ ऋत्वीक अनिल मोडीकर, दीपक रमेश पाटील आणि केतन महावीर ठगरे या दहा जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हुपरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ नुसार हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान नैसर्गिक न्यायतत्त्वाला अनुसरून संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, या टोळीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाल्याचे आणि सामाजिक शांतता बाधित होत असल्याचे स्पष्ट झाले. सार्वजनिक हिताचा विचार करून पोलीस अधीक्षकांनी १६ मार्च २०२६ रोजी या टोळीला जिल्ह्याबाहेर काढण्याचे आदेश दिले.
हद्दपार केलेले हे १० इसम जर कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही आढळल्यास नागरिकांनी तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्याशी किंवा नियंत्रण कक्षाशी (०२३१-२६६२३३३) संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाही देखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्हयातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी यापुढेही मोका आणि एमपीडीए सारख्या कठोर कारवाया सुरूच राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.


