डी.के.टी.ई. संस्थेच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकमध्ये ‘इंडिया टेक समिट २०२६’ दिमाखात संपन्न; गुगल जेमिनी टेक हबचा भव्य उपक्रम
schedule23 Jan 26 person by visibility 40 categoryराज्य
इचलकरंजी : डी. के. टी. ई. सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकमध्ये गुगल स्टुडंट ॲम्बेसेडर इंडिया टेक समिट २०२६ अंतर्गत आयोजित आयडियाथॉन ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. ‘ए. आय. फॉर इम्पॅक्ट’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत देशातील विविध पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालये व विद्यापीठांमधील विद्यार्थी संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या तांत्रिक कौशल्याचे सशक्त दर्शन घडविले.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कृषी, आरोग्य, शिक्षण व स्मार्ट सिटी या महत्त्वाच्या क्षेत्रांतील जटिल समस्यांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने कल्पक, नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी उपाय सुचविले. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रवी आवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात त्यांनी डी. के. टी. ई. संस्था आधुनिक तंत्रज्ञानाच्या अंगीकारासाठी सदैव अग्रेसर असून विद्यार्थ्यांनी संशोधनशील वृत्ती जोपासून ए. आय. तंत्रज्ञानाचा विधायक वापर करावा, असे प्रतिपादन केले.
गुगल स्टुडंट ॲम्बेसेडर प्रोग्राम अंतर्गत पॉलिटेक्निकच्या १०० पेक्षा अधिक ग्रुप व ४४० हून अधिक विद्यार्थ्यांनी विक्रमी नोंदणी केली. अखिल भारतीय स्तरावर विद्यार्थी नोंदणीमध्ये यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक अग्रस्थानावर राहिल्याची बाब विशेष गौरवास्पद ठरली. या हॅकाथॉनमुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना थेट जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे प्रतिपादन प्राचार्य प्रा. ए. पी. कोथळी यांनी केले.
गुगल स्टुडंट ॲम्बेसेडरपदी पॉलिटेक्निकच्या ११ विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रवी आवाडे व सर्व विश्वस्तांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्राचार्य प्रा. ए. पी. कोथळी, उपप्राचार्य प्रा. बी. ए. टारे, संगणक विभागप्रमुख प्रा. आर. ए. हातगिणे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व इव्हेंट कोऑर्डिनेटर प्रा. शुभम रसाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील ११ गुगल स्टुडंट ॲम्बेसेडर्सनी नियोजन व व्यवस्थापन कौशल्यपूर्णरीत्या पार पाडले. कार्यक्रमास विविध विभागांचे प्रमुख, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.