हातकणंगले : होडी शर्यतीतील वाद विकोपाला, हाणामारीत जखमी युवकाचा नाहक बळी
schedule17 Aug 24 person by visibility 313 categoryगुन्हे
हातकणंगले : होडयाच्या शर्यतीवेळी किरकोळ कारणावरून दोन समाजातील युवकामध्ये वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन सचिन बाबासो कांबळे (रा. रुई) हा युवक गंभीर जखमी झाला होता. आज शनिवारी त्याचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिनच्या मृत्यूनंतर गावात तणाव निर्माण झाला आहे.
रुई ता. हातकणंगले येथे होडयाच्या शर्यतीवेळी बौद्ध समाज आणि मातंग समाजाच्या युवकामध्ये हाणामारी झाली होती. हा विषय मिटवण्यासाठी गेलेल्या दोन्ही समाजाच्या युवकामध्ये रुई, साठेनगर येथे काल, शुक्रवारी रात्री पुन्हा हाणामारी झाली. यामध्ये सचिन कांबळे सह तीन ते चार युवक गंभीर जखमी झाले होते. जखमीवर कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, आज, शनिवारी पहाटे उपचारादरम्यान सचिन कांबळे याचा मृत्यू झाला. या घटनेने गावात तणाव निर्माण झाला आहे. संशयितांना अटक केल्याशिवाय सचिनचा मृतदेह ताब्यात घेण्यास बौद्ध समाजाने नकार दिल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून तीन जणांना ताब्यात घेतले आहे.