योगातून निरोगी जीवनाचा संदेश; ‘गोकुळ’मध्ये जागतिक योग दिन साजरा...
schedule21 Jun 26 person by visibility 132 categoryउद्योग
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) मार्फत २१ जून रोजी जागतिक योग दिन उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात साजरा करण्यात आला. गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमास प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे आणि डॉ.चंद्रकांत परूळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर योग प्रशिक्षक संजय पोवार यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून देत विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेची प्रात्यक्षिके सादर केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक योगाभ्यासात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमातून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य डॉ.चंद्रकांत परूळेकर म्हणाले, “योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि सकारात्मकता वाढण्यास मदत होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी व संतुलित जीवनशैलीसाठी योगाचा अंगीकार करणे आवश्यक आहे. प्रत्येक कर्मचारी, अधिकारी आणि सभासदांनी दैनंदिन जीवनात योगाला स्थान देऊन निरोगी जीवनाचा संकल्प करावा.”
कार्यक्रमास विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. पी. पाटील यांनी केले, तर डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी आभार मानले.
याप्रसंगी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परूळेकर, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, हणमंत पाटील, दत्तात्रय वागरे, बाजीराव राणे, दीपक पाटील, अशोक पुणेकर, आर. बी. पाटील, मानसिंग देशमुख, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.