भागीरथी संस्था आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धा पार पडली प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात, विविध कलाकारांनी हजेरी लावत स्पर्धकांचा वाढवला उत्साह
schedule16 Sep 25 person by visibility 65 categoryसामाजिक

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठया बक्षिसाची स्पर्धा अशी ओळख असलेल्या भागीरथी झिम्मा फुगडी स्पर्धेला, आज प्रचंड प्रतिसाद मिळाला. महासैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या स्पर्धेत सुमारे दहा हजार महिलांनी सहभाग घेवून, पारंपारिक लोककला आणि खेळांचे सुंदर प्रदर्शन घडवले. नटूनथटून आलेल्या पारंपारिक वेशातील महिलांचा उत्साह, जल्लोष आणि चैतन्य यामुळे यावर्षीची स्पर्धासुध्दा अविस्मरणीय ठरली. दरम्यान अनेक कलाकारांनी या स्पर्धेला उपस्थिती लावत सहभागी महिलांना प्रोत्साहानाची दाद दिली.
धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित, भागीरथी महिला संस्था आणि भाजपच्यावतीने खासदार महोत्सवार्ंगत झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी आज सकाळपासूनच महासैनिक दरबार हॉलकडे अनेक महिलांची पावले पडत होती. चंदगडचे धनंजय महाडिक युवाशक्तीचे प्रमुख मायाप्पा पाटील हे तालुक्यातील सुमारे ७०० महिलांना घेवून, वाजत गाजत स्पर्धा स्थळी आले. तर अकरा वाजण्याच्या सुमारास स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. मंगलताई महाडिक, शकुंतला महाडिक, मंगलताई महादेवराव महाडिक, साधनाताई शंकरराव महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक, वैष्णवी पृथ्वीराज महाडिक, अंजली विश्वराज महाडिक, डॉ. प्रिया दंडगे, माधुरी नकाते आणि हॅलो कदम चित्रपटातील अभिनेत्री श्वेता कामत यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरवात झाली. श्री महालक्ष्मीचे पूजन, दिपप्रज्वलन आणि तुळशीला पाणी घालून उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर वैष्णवी आणि अंजली यांच्या हस्ते जाते फिरवून स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी अरूंधती महाडिक यांच्यासह मान्यवर महिलांनी, मंचावरच सुप नाचवणे, घागर घुमवणे आणि फुगडी घालून उद्घाटनाच्या सोहळयात जोश निर्माण केला. तर मंगलताई महादेवराव महाडिक यांनी घेतलेल्या उखाण्याला महिलांनी टाळयांच्या गर्दीत दाद दिली. अंजली महाडिक यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तर डॉ. प्रिया दंडगे, सौ. वैष्णवी महाडिक आणि परीक्षक सुखदा कुलकर्णी यांनी मनोगताद्वारे स्पर्धेच्या संयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. मंगलताई महाडिक यांनी महिला स्पर्धकांचे कौतुक केले. तर अभिनेत्री श्वेता कामत यांनी आपल्या खास शैलीत संवाद साधत, कोल्हापूरबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कोल्हापूर ही कर्मभूमी असून, रसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे काम करण्यासाठी आणखी बळ मिळाल्याचे कामत यांनी सांगितले.
त्यानंतर स्पर्धेचे प्रायोजक जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स, जिजाई मसालेच्या वैशाली भोसले आणि काले बजाजचे विप्लव कासलीवाल यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान कलर्स मराठी वाहिनीवरील पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेतील प्रेरणाची भूमिका करणारी शाश्वती पिंपळकर आणि मिथूची भूमिका साकारणारी प्राजक्ता परब यांनी उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला. तसेच मालिकेबद्दल माहिती दिली. त्यानंतर अशोक मा. मा. या मालिकेतील रसिका वखारकर, इंद्रायणी मालिकेतील कांची शिंदे, क्षमा देशपांडे आणि सन मराठी टिव्हीवरील जुळली गाठ गं या मालिकेतील अभिनेत्री सुरेखा कुडची यांनीही झिम्मा फुगडीच्या स्पर्धेला उपस्थिती लावत धमाल मज्जा केली. सौ. अरूंधती महाडिक यांनी सर्व कलाकारांचा सत्कार केला. सौ. अरूंधती महाडिक यांना डोळयासमोर ठेवून, आपण मालिकेत भूमिका साकारली आहे. त्यासाठी युटयूब आणि इन्स्टावरील सौ. महाडिक यांचे अनेक व्हिडीओ पाहिल्याचे अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी सांगताच, महिलांनी टाळयांचा कडकडाट केला.
झिम्मा, घागर घुमविणे, उखाणे, सूप नाचविणे, काटवट काणा, छुई फुई, जात्यावरील ओव्या, फुगडी, घोडा घोडा आणि पारंपारिक वेशभूषा अशा प्रकारात ही स्पर्धा पार पडली. प्रत्येक गटामध्ये चुरशीने सहभागी होवून, महिलांनी कौशल्यपूर्ण खेळाचे सादरीकरण केले. वेशभुषा स्पर्धेसाठी अनेक महिलांनी ऐतिहासिक आणि देवदेवतांच्या वेशभुषा करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान काही कलाकारांनी थेट झिम्मा फुगडीचा फेर घालत स्पर्धेत रंग भरला.
स्पर्धेदरम्यान खासदार धनंजय महाडिक, भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी उपस्थिती लावत स्पधर्कांचा उत्साह वाढवला. या स्पर्धेला महिलांनी उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल अरूंधती महाडिक यांनी समाधान व्यक्त करत, स्पर्धेच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात एक आनंदाचा दिवस निर्माण केल्याचा मनस्वी आनंद असल्याचे सांगितले. आजच्या स्पर्धेसाठी भागीरथी संस्थेच्या सदस्या, परिक्षक, स्वयंसेवक अशा सर्व घटकांनी नियोजनबध्द काम केल्याने ही स्पर्धा यशस्वी झाल्याचे सौ. वैष्णवी महाडिक यांनी सांगितले. दरम्यान सकाळच्या सत्रात सर्व महिलांना चहा-नाष्टा, तर दुपारी स्नेहभोजन देण्यात आले. तर संगीताताई खाडे, गायत्री राऊत, अर्पिता जाधव, तेजस्विनी घोरपडे, कल्पना निकम, रूपाली जाधव, पुष्पा पोवार, प्राजक्ता घोरपडे यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांनी स्पर्धेला भेट देवून महिलांचा उत्साह वाढवला.