नियमित व्यायाम, सकस आहार घेण्याचे अरुंधती महाडिक यांचे विद्यार्थीनींना आवाहन
schedule06 Dec 24 person by visibility 204 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : निरोगी शरीर संपदा ही सर्वात मोठी देणगी आहे. मुली जन्मताच कष्टाळू असतात. पण किशोर वयीन मुलींनी आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित व्यायाम आणि सकस आहार घ्यावा, असे आवाहन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी केले. राधानगरी तालुक्यातील अडोली इथल्या महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात त्या बोलत होत्या.
राधानगरी तालुक्यातील अडोली इथल्या महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात शालेय विद्यार्थीनींसाठी कळी उमलताना हा कार्यक्रम झाला. त्यातून विद्यार्थीनींना आरोग्य विषयक मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक होत्या. तर डॉ. अनुष्का वाईकर आणि अतुल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष अतुल जोशी यांच्या हस्ते महाडिक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना अरुंधती महाडिक यांनी मुलींशी एखाद्या मैत्रीणी प्रमाणे संवाद साधला. किशोर वयात मुलींना मासिक पाळी सुरू होते. हा निसर्गक्रम असुन त्यामध्ये भीती वाटण्याची गरज नाही. शारीरिक बदलांना आत्मविश्वासाने सामोरे जा, तुमची आई हीच तुमची खरी मैत्रीण आहे. तिच्याशी मनमोकळेपणांनं बोला, सॅनेटरी नॅपकिनचा वापर करा, डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध उपचार करा, असे आवाहन अरुंधती महाडिक यांनी केले.
तर डॉक्टर अनुष्का वाईकर यांनी मुलींना वैद्यकीयदृष्टया मार्गदर्शन केले. किशोरवयात शरीरात हार्मोनल बदल होतात. अशावेळी नियमित व्यायाम आणि सकस आहार महत्वाचा असतो, असे त्यांनी सांगितले. दरम्यान याच कार्यक्रमात सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते विद्यार्थीनीना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक व्ही. पी. पाटील, विजय महाडिक, टी. डी. पाटील, विमल पाटील, शुभांगी मगदूम, एन. एल. कुलकर्णी, नम्रता पाटील, स्वाती कांबळे, नंदू शिंदे, जयवंत भालेकर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.