कोल्हापूर : रामानंदनगर–जरगनगर रस्त्याचे काम तातडीने सुरू करा : के.मंजूलक्ष्मी
schedule21 Nov 25 person by visibility 69 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : नगरोत्थान योजने अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची आज प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी पाहणी केली. यामध्ये जरगनगर परिसर रस्ता, रसिका हॉटेल शेजारील रस्ता तसेच निर्माण चौक ते रामानंदनगर–जरगनगर हा महत्त्वाचा असलेला रस्ताचा समावेश होता.
या रस्त्यांवरील कामामध्ये ठेकेदाराने केवळ बाजूपट्टीचे खडीकरण करून काम थांबविले असल्याचे आढळून आले. याबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासकांनी उर्वरित रस्त्याचे काम तातडीने आजच सुरू करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदाराला दिले.
तसेच रामानंदनगर परिसरात सुमारे ६०० मीटरपर्यंतचे बाजूपट्टीचे काम तातडीने सुरू करता येऊ शकते, त्यामुळे ते काम प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. यासोबतच या मार्गावरील पोल शिफ्टिंग तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी झाडे हटविण्याची कामे सुरु करण्याबाबतही सूचना दिल्या. सायंकाळी संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी सर्व यंत्र सामुग्री आणून संबंधीत रस्तेच काम सुरु केले आहे.
यानंतर प्रशासकांनी रसिका हॉटेल शेजारील 18 मीटरचा रस्त्याची पाहणी केली. याठिकाणी रस्त्यावर असलेली अतिक्रमणे व बाधीत होणा-या मिळकती ताब्यात घेण्यासाठी नगररचना विभागामार्फत नोटीस देण्याच्या सूचना दिल्या. रसिका हॉटेल ते सफायर पार्क अमृत 2 अंतर्गत मंजूर ड्रेनेजची कामे तातडीने पुर्ण करण्याचे आदेश सहा.आयुक्तांना दिले.
या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहा. आयुक्त कृष्णा पाटील, उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे उपस्थित होते.