कोल्हापूर कृषी महोत्सव - 2023
schedule30 Mar 23 person by visibility 502 categoryसंपादकीय
प्रत्येक वर्षी पावसाचे प्रमाण बदलत राहते, ते निश्चित नाही. एखाद्या वर्षी धो-धो कोसळणारा पाऊस कधी-कधी तो पडतही नाही. त्यामुळे पाणी हा विषय म्हणजे बदलणारा घटक आहे. ज्या प्रदेशात पाण्याची कमी त्या ठिकाणी उत्पादनाची अनिश्चितता जास्त काळ राहणार. राज्याचा 1/3 पेक्षा जास्त प्रदेश अवर्षन प्रवण आहे. शेतीच्या दृष्टीने पाणी अत्यंत आवश्यक घटक आहे. शाश्वत शेतीच्या दृष्टीने जलसिंचन अत्यंत आवश्यक आहे. अवर्षणग्रस्त भागात कोरडवाहू शेती गरीबीत भर घालते असे चित्र सार्वजनिकरित्या दिसते. मात्र कोल्हापूर जिल्हा याला अपवाद आहे.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये दाट झाडी असून या ठिकाणी पर्जन्यमानाचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातील पश्चिमेकडील गगनबावडा, चंदगड, शाहूवाडी, राधानगरी आदी तालुक्यांमध्ये पर्जन्यमानाचे प्रमाण जास्त तर पुर्वेकडील हातकणंगले, शिरोळ तालुक्यात पर्जन्यमानाचे प्रमाण कमी आढळते. येथील जमिनीचा विचार करता प्रामुख्याने तीन भाग पडतात. पूर्व भागात मध्यम व काळ्या मातीचा प्रदेश, पश्चिम भागात डोंगराळ व तांबड्या मातीचा भूप्रदेश तर मध्य भागात गाळाच्या जमिनीचा भूप्रदेश. येथील माती सुपीक आहे. भरगोस उत्पादनाच्या दृष्टिने शेतकऱ्यांना लाभदायक आहे. जिल्ह्याचा विचार करता एकुण अन्नधान्य पिकाखालील क्षेत्रापैकी 93.10 टक्के क्षेत्र तृणधान्याखाली तर उर्वरित 6.90 टक्के कडधान्याखाली होते. जिल्हयात प्रामुख्याने सर्वाधिक पीक घेतले जाते ते उसाचे मात्र हल्ली पीक उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल होवून कृषी क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबवित आहेत. अधिक फायदा देणारी उत्पादने घेत आहेत. तसेच कृषी क्षेत्रात पारंपरिक पध्दतीने कार्यरत न राहता शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्याचबरोबर कृषी पूरक व्यवसाय करत स्वत:ची आर्थिक उन्नती साधली आहे...साधत आहेत.
सन 2023 हे 'आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष' म्हणून घोषित झाले आहे. याच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कृषी अधिक्षक कार्यालयाने राधानगरी तालुक्यातील राशिवडे बु. या ठिकाणी 26 ते 30 मार्च या कालावधीमध्ये 'एक जिल्हा- एक उत्पादन' ही टॅगलाईन घेवून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 26 ते 30 मार्च या कालावधीत संपन्न झालेल्या या कृषी महोत्सवामध्ये वेगवेगळी हटके उत्पादने, परिसंवाद, चर्चासत्रे, सेंद्रिय धान्य, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, रेशीम, मधुमक्षीका पालन हे कृषीपूरक उद्योग, दुग्ध व्यवसाय, कृषी माल, खरेदीदार- विक्रेता यांचा संवाद त्याचबरोबर कृषीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचे प्रदर्शन व विक्री यांचा समावेश होता.
या बळीराजा महोत्सव यात्रेत, शेतकऱ्यांसाठी माल प्रक्रिया, पीक उत्पादकता वाढ अभियान, मार्गदर्शन त्याचबरोबर कल्पनातीत उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान आदी बाबींचा समावेश होता. पाच दिवस चाललेल्या या कृषी महोत्सवाचे सर्वात मोठे फलित म्हणजे अधिक उत्पादन घेण्याबाबत जिल्ह्यातील इतर भागातून आलेल्या शेतकऱ्यांमध्ये झालेले विचारांचे आदान-प्रदान होय. कृषी तज्ज्ञांचे अचूक मार्गदर्शन. कदाचित याच मार्गदर्शनातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाची सोनेरी सकाळ उगवेल, तो आर्थिक दृष्ट्या समृध्द होईल आणि आनंदाने म्हणू शकेल, 'जहाँ डाल डालपर बसेरा करती है सोने की चिडीयॉ वो भारत देश है मेरा..'
✍ फारुक बागवान,
सहायक संचालक
विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर.