SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी भाविकांची अलोट गर्दीमतदान संविधानाने दिलेला अमूल्य अधिकार : जिल्हाधिकारी अमोल येडगेकोल्हापूर जिल्ह्याला "पर्यटन हब" म्हणून अधिकृत दर्जा द्यावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणीतखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शनमराठी भाषा’ ही नदीप्रमाणे सतत वाहणारी परंपरा ; मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णीप्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्यक्रमतखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी घेतले दर्शनचॅनेल बी च्या वर्धापन दिनानिमित्त खासदार महोत्सवांतर्गत घेतलेल्या खुल्या निसर्ग चित्र स्पर्धेला उदंड प्रतिसादअखिल भारतीय ग्राहक पंचायत, शाखा कोल्हापूर व के.एम.टी. उपक्रमाच्या वतीने आयोजित “प्रवासी दिन” उत्साहात साजराकोरे अभियांत्रिकीत संशोधन लेखन विषयावर कार्यशाळा

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्याला "पर्यटन हब" म्हणून अधिकृत दर्जा द्यावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी

schedule25 Jan 26 person by visibility 111 categoryराज्य

▪️राष्ट्रीय पर्यटन दिनी ई - मेल द्वारे केले मागणीचे निवेदन सादर

 

कोल्हापूर  : देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जागतिक समुदायामध्ये भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय पर्यटन दिन आज २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. कोल्हापूर जिल्हा हा ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक, सांस्कृतिक पर्यटनासह उद्योजक आणि व्यापार पर्यटनाची मोठी क्षमता असणारा जिल्हा आहे. गेल्या अनेक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात देशविदेशातील पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला "पर्यटन हब" म्हणून अधिकृत दर्जा द्यावा, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे केली आहे. मागणीचे निवेदन त्यांनी आज ई- मेल द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.

 

या निवेदना पुढे म्हंटले आहे कि, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा धार्मिक सणांसह साप्ताहिक, वार्षिक सुट्ट्यांच्या दिवशीही कोल्हापुरात पर्यटकांची प्रचंड गर्दी पहायला मिळते. एकंदरीत कोल्हापूर जिल्हा एकप्रकारे "पर्यटन हब" च्या दृष्टीने वाटचाल करत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला "पर्यटन हब" म्हणून अधिकृत दर्जा मिळाल्यास कोल्हापूर हे पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे आर्थिक केंद्र म्हणून उदयाला येऊ शकते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला "पर्यटन हब" म्हणून अधिकृत दर्जा देणेबाबतची मागणी समस्त कोल्हापूरवासियांकडून केली जात आहे.    

 

कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाची मोठी क्षमता असून, यासाठी खालील मुद्दे महत्त्वपूर्ण ठरतात. 

*१. धार्मिक वारसा :*

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर: हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असून येथे दरवर्षी कोट्यवधी भाविक येतात. यासह खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, श्री जोतीबा मंदिर, श्री नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर, आदमापूर येथील श्री बाळूमामा मंदिर, पट्टणकोडोली येथील श्री बिरदेव मंदिर, श्री बाहुबली ब्रम्हचर्य आश्रम, श्री कणेरी मठ असा धार्मिक श्रद्धास्थाने  कोल्हापूरमध्ये वसली आहेत.  

 

*२. ऐतिहासिक वारसा :* 

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत, ज्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे किल्ले केवळ लष्करी तळ नव्हते, तर त्या काळातील स्थापत्यकलेचे उत्तम नमुने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावनझालेला किल्ले पन्हाळा गड, किल्ले विशाळगड, वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची साक्ष देणारी पवित्र पावनखिंड, गगनगिरी गड, भुदरगड, रांगणा किल्ला, सामानगड येथील सात दरवाजांची विहीर, यासह न्यू पॅलेस, शालिनी पॅलेस, भवानी मंडप हे कोल्हापूरच्या राजघराण्याचा इतिहास आणि वास्तुकलेचा हा एक उत्तम नमुना आहे.

 

*३. नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यजीव :*

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य: गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे अभयारण्य निसर्गप्रेमींना आकर्षित करते. दाजीपूर जंगल: ट्रेकिंग आणि जंगल सफारीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. त्याचबरोबर आंबा घाट हा सह्याद्री वाघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. 'विशाळगड संवर्धन राखीव क्षेत्रात' पर्यकांसाठी जंगल सफारी उपलब्ध आहे. कोकण किनारपट्टीशी जवळीक: कोल्हापूर हे गोवा, कोकण तसेच कर्नाटक राज्यात  जाणाऱ्या पर्यटकांचे महत्त्वाचे ठिकाण आहे. यासह कोल्हापुरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव सद्या पर्यटकांचा आकर्षकबिंदू ठरत आहे. यासह जिल्ह्यात उपलब्ध असणारे राधानगरी सह इतर धरणे, नैसर्गिक धबधबे, सनसेट पाँइंट, सह्याद्री पर्वतरांगा, घाट कोल्हापूरच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालत आहेत.  

 

*४. सांस्कृतिक व औद्योगिक ओळख :*

कोल्हापूरी खाद्यसंस्कृती: तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ-पाव, गुळ, साखर जगभरात प्रसिद्ध आहे. कोल्हापूरी चप्पल, साज दागिने, चांदीचे दागिने, वस्त्रोद्योग, कास्टिंग, मशिनिंग आणि फाऊंड्री उद्योगांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या औद्योगिक वसाहती, साखर कारखाने, पारंपारिक हस्तकला उद्योग हे कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्र राज्यातील एक प्रगत औद्योगिक जिल्हा बनवत आहेत. यासह नुकत्याच मंजूर झालेल्या सर्किट बेंच, आय.टी. पार्क मुळे कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढत जाणार आहे.

 

*५. कला, क्रीडा, शिक्षण, वैद्यकीय नगरी :*

राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण, विशेषतः गरीब आणि मागास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा पाया रचला, ज्यामुळे कोल्हापूरमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण झाले.  येथे विविध अभ्यासक्रमांसाठी अनेक महाविद्यालये आहेत. शिवाजी विद्यापीठ या विद्यापीठाच्या अखत्यारीत कोल्हापूर, सांगली आणि सातारा हे तीन जिल्हे येतात. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याने शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

 

राजर्षी शाहू महाराजांच्या काळात संगीत, नाटक, चित्रकला आणि हस्तकला यांसारख्या कलांना राजाश्रय मिळाला, ज्यामुळे अनेक कलाकारांना प्रोत्साहन मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीची सुरुवात आणि सुवर्णकाळात कोल्हापूरचे मोठे योगदान आहे. या सर्व कलात्मक आणि सांस्कृतिक वारशामुळे कोल्हापूरला खऱ्या अर्थाने 'कलानगरी' म्हटले जाते.

राजर्षी शाहू महाराजांनी या नगरीत खेळांचा पाया रचला, जो आजही तितक्याच उत्साहाने जपला जात आहे. कोल्हापूरला "क्रीडानगरी" किंवा "क्रीडापंढरी" म्हणून ओळखले जाते, कारण येथील रक्तातच कुस्ती आणि फुटबॉलसारख्या खेळांची आवड भिनलेली आहे. कोल्हापूर ही कुस्तीगिरांची खाण आहे. येथील खासबाग मैदान हे भारतातील एकमेव गोलाकार कुस्ती मैदान असून, शहरात आणि जिल्ह्यात अनेक "तालीम" (आखाडे) आहेत, जिथे देशविदेशातील मल्ल आजही मातीच्या कुस्तीचे धडे गिरवतात. त्यामुळे कोल्हापूर हे खऱ्या अर्थान कुस्तीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. कोल्हापूरला 'महाराष्ट्राचे फुटबॉल हब' म्हटले जाते. येथे स्थानिक क्लबच्या सामन्यांनाही ६०,००० हून अधिक प्रेक्षक गर्दी करतात. कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक नामवंत फुटबॉल खेळाडूंनी राज्याच्या आणि देशाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. भारताला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव याच मातीतील होते. तसेच नेमबाजीमध्ये राही सरनोबत, तेजस्विनी सावंत आणि पोहण्यामध्ये वीरधवल खाडे यांसारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचा डंका वाजवला आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्याने आरोग्यसेवेत मोठी प्रगती केली असून, अत्याधुनिक सुविधा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांमुळे गोवा, कोकण आणि कर्नाटकच्या सीमेवरील रुग्णांसाठी कोल्हापूर हे सोयीस्कर ठिकाण आहे, ज्यामुळे येथे वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळाली आहे.  

 

*६. पायाभूत सुविधा, दळणवळण :*

कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि कोकण- गोवा राज्यांना जोडणारा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. नुकतेच कोल्हापूर विमानतळाचा झालेला विस्तार, प्रस्तावित कोल्हापूर - कोकण रेल्वेमार्ग, शक्तीपीठ महामार्ग, सोलापूर - रत्नागिरी महामार्ग यामुळे वाहतुकीची कनेक्टीव्हिटी वाढणार आहे. यासह आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, पूरनियंत्रण प्रकल्प, यामुळे पायाभूत सुविधांचाही विकास होणार आहे. 

 

सबब, वरील सर्व बाबींचा विचार होवून कोल्हापूरला अधिकृत 'पर्यटन हब' चा दर्जा देणेबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवेदनातून केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes