मतदान संविधानाने दिलेला अमूल्य अधिकार : जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule25 Jan 26 person by visibility 69 categoryराज्य
▪️मतदार दिनानिमित्त पथनाट्याचे आयोजन, नवमतदारांना ओळखपत्राचे वाटप, मतदान कर्मचाऱ्यांचा सन्मान
कोल्हापूर : स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचा अवलंब करीत संविधानाने प्रत्येक १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला दिलेला मतदानाचा हक्क अमूल्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. १६ वा राष्ट्रीय मतदार दिन जिल्हाधिकारी कार्यालयात तरुण मतदारांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी नवमतदारांना उद्देशून कार्यक्रमात मतदानाचे महत्त्व, मतदान प्रक्रिया व यंत्रणा याविषयी माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, उपजिल्हाधिकारी निवडणूक गीता गायकवाड, उपजिल्हाधिकारी महसूल डॉ. संपत खिलारी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, तहसीलदार सुनिता नेर्लीकर, मैत्रीय संघटनेच्या मयुरी आळवेकर यांच्यासह नवमतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, “माझा भारत माझे मत, मी भारत आहे” हे यावर्षीचे राष्ट्रीय मतदार दिनाचे ब्रिदवाक्य असून, देशातील ९६.८ कोटी मतदारांना संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क अमूल्य आहे. या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदान यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे मतदानादिवशी सुट्टी आहे म्हणून इतरत्र न जाता मतदान करून आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी योगदान द्या. मतदार नोंदणी आयोगाने अधिक सुलभ करीत आपल्या अडचणी सोडविण्यासाठी नियुक्त बीएलओची मदत कधीही घेता येईल. कोल्हापूर जिल्ह्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान करणारी मतदान केंद्रे आहेत. जिल्हा नेहमीच मतदान टक्केवारीत आघाडीवर आहे, परंतु अजून पुढे जाऊन राष्ट्रीय मतदार दिनी सर्व मतदारांनी मतदानावेळी मतदान करण्याचा संकल्प करूया, असे सांगत युवकांनी जनजागृती करीत सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार म्हणाले, देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्याला मिळालेला प्रमुख अधिकार म्हणजे मतदान होय. ब्रिटिश राजवटीनंतर आता मतदानातून आपण आपले राज्यकर्ते निवडून देतो. हे करीत असताना प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा वापर करायला हवा. मतदानात अमिषाला बळी न पडता युवकांनी मतदानाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी निवडणूक गीता गायकवाड यांनी केले. त्यांनी मतदार दिनाचे महत्त्व सांगत, जागृत मतदार हीच लोकशाहीची खरी ओळख आहे, असे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिसरात विविध पथनाट्यांचे सादरीकरण झाले. यात १२५ मुलींचे शासकीय वसतिगृह मराठा कॉलनी, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह साईनाथ कॉलनी, सामाजिक न्याय विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या मुलींचे शासकीय वसतिगृह तसेच श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीच्या संदर्भात पथनाट्य सादर केले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात नवमतदारांना जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रतीक्षा कोंडूसकर, यश सुतार, प्रथमेश गायकवाड, वेंकटेश घंटे यांचा समावेश होता.
त्याचबरोबर निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यात निवडणूक नायब तहसीलदार बाबुराव बोडके, पोपट पाटील, महसूल सहायक राहूल दोंडे, लिपिक नंदकिशोर नलवडे, मुख्याध्यापक रवींद्र मोरे, पर्यवेक्षक के. व्ही. बसागरे, श्रीकांत पोवार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी रेखा पाटील, सारिका पाटील, संगीता साळोखे, संगणक परिचालक रणजित जाधव व संदीप कुबडे यांचा समावेश होता. राष्ट्रीय स्तरावरील कोल्हापूरचे शाहीर आझाद नायकवडी यांनी मतदान जनजागृतीपर पोवाडा सादर केला. तसेच मैत्रीय संघटनेच्या मयुरी आळवेकर यांचाही सन्मान झाला. उपस्थितांनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदानाची प्रतिज्ञा घेतली. आभार नायब तहसीलदार बाबुराव बोडके यांनी मानले, तर सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी यांनी केले.