कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण समितीच्या सदस्यांना न बोलवता बैठक घेतल्यास तुमच्यावर हक्कभंग दाखल करू; आमदार सतेज पाटील यांचा प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांना दिला इशारा
schedule23 May 25 person by visibility 239 categoryराज्य

▪️कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण समिती आढावा बैठक
कोल्हापूर : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण समितीच्या सदस्यांना न बोलवता बैठक घेतल्यास तुमच्यावर हक्कभंग दाखल करू असा सज्जड इशारा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांना दिला. आज राजर्षी शाहू सभागृहात घेतलेल्या नागरी प्राधिकरणच्या आढावा बैठकीत त्यांनी हा इशारा दिला.
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची आढावा बैठक आज सर्किट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृहात बोलावली होती. यावेळी प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या ४२ गावांचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांनी प्राधिकरणला शासनाकडून किती पैसे आले आणि किती खर्च केले याबाबत माहिती दिली. सध्या प्राधिकरणने 28 कोटी रुपये एफडी केली असून 13 कोटी 27 लाख रुपये डेव्हलपमेंट साठी ठेवण्यात आल्याचे सांगितले. यावेळी डेव्हलपमेंट साठी ठेवण्यात आलेली रक्कम ४२ गावांच्या विकासासाठी वाटप करावी अशी मागणी उपस्थित सरपंचानी केली. लोकसंख्यानुसार या रकमेचे वाटप करावे असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, नऊ मे रोजी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण समितीची बैठक झाली होती. या बैठकीला खासदार श्रीमंत शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांना बोलावण्यात आले नव्हते. यावरून उपस्थित सरपंचानी आक्षेप घेवून जाब विचारला. यापुढे असे खपवून घेतले जाणार नाही असे सांगण्यात आले. यावेळी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांना तुम्ही राजकारण करू नका असे सुनावले. प्राधिकरण समितीच्या सदस्यांना न बोलवता, आम्हाला विश्वासात न घेता बैठक घेतल्यास तुमच्यावर हक्कभंग दाखल करू असा सज्जड इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. तसेच प्राधिकरणने जागा ताब्यात घेतल्यानंतर त्यामधील अंतर्गत रस्ते देखील त्यांच्या ताब्यात जातात. मात्र काही मालक लोक रस्ते आमचे आहेत असे सांगून त्रास देतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, कुठल्याही कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नका अशा सूचना केल्या.
यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, प्राधिकरणाचे सचिन ताटे अंशुमन गायकवाड सिद्धांत राऊत मिलिंद कांबळे या अधिकाऱ्यांसह माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, प्रकाश पाटील, युवराज गवळी, आनंदा बनकर बाबासो माळी, सचिन पाटील, दिलीप टिपुगडे, सुनिल पोवार, मोरेवाडी सरपंच ए के कांबळे, अमर मोरे,आशिष पाटील, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, उचंगाव सरपंच मधुकर चव्हाण, वळिवडे सरपंच रूपाली कुसाळे, गोकुळ शिरगांव सरपंच चंद्रकांत डावरे, साताप्पा कांबळे, किरण आडसूळ, रावसाहेब पाटील, गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, प्रताप चंदवाणी, विनोद हजुराणी, न्यु वाडदे वसाहत सरपंच दतात्रय पाटील, कणेरी सरंपच निशांत पाटील अर्जून इंगळे आदी उपस्थित होते.