राजर्षी शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत गुरुवारी ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक : आमदार राजेश क्षीरसागर
schedule02 Mar 26 person by visibility 122 categoryराज्य
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांचे जन्म शताब्दी वर्ष म्हणून साजरे होत असताना छत्रपती शाहू मिल येथील स्मारकाचा कामास सुरवात व्हावी, अशी अपेक्षा समस्त शाहू प्रेमी आणि कोल्हापूर वासियांकडून व्यक्त होत असल्याबाबत मी लेखी पत्राद्वारे कळविले होते. त्या अनुषंगाने मंत्री, वस्त्रोद्योग विभाग यांनी सचिव, वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांना "कॅबिनेटसाठी प्रस्ताव मागवावा" असे निर्देश दिले होते. यासह या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोल्हापूर येथील छत्रपती शाहू मिल येथे मंजूर राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारून परिसर सुशोभित करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रस्ताव तात्काळ मागवून घेवून त्यास महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२६ मध्ये निधीची तरतूद करावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती.
या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या कोल्हापूर येथील श्री. शाहू छत्रपती मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाकरिता जागेचे हस्तांतरण करणेबाबत मा.वस्त्रोद्योग मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दालन क्र.३०३, तिसरा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई येथे गुरुवार दि.०५ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
या बैठकीस आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव, जिल्हाधिकारी कोल्हापूर, आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका, वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त, सामान्य प्रशान विभागाचे उपसचिव, वस्त्रोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आदी उपस्थित राहणार आहेत.