विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा १५ मार्च रोजी
schedule13 Mar 26 person by visibility 110 categoryराज्य
कोल्हापूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, कोल्हापूर व जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका कोल्हापूर व महानगरपालिका इचलकरंजी, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबीर तथा शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा रविवार, दिनांक 15 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा व सत्र न्यायालय परिसर कसबा बावडा येथे होणार आहे. या महाशिबीराचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा कोल्हापूरचे पालक न्यायमूर्ती अभय आहुजा, न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या हस्ते व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष कविता अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
विधी सेवा महाशिबीर जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या शिबिराच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ आणि कायदेशीर मार्गदर्शन मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महाशिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दिपाली डोईफोडे, जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. 1 राजश्री अदोने, महाराष्ट्र ॲन्ड गोवा बार असोसिएशनचे सदस्य ॲड. विवेकानंद घाटगे, कोल्हापूर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केले आहे.