मुश्रीफांचे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना आवाहन: कर्जमाफीची वाट न पाहता मुदतीत कर्ज फेडा!
schedule13 May 26 person by visibility 129 categoryराज्य
कोल्हापूर : शासनाच्या निर्णयानुसार यावर्षीची कर्जे ही कर्जमाफी योजनेसाठी पात्र नसल्यामुळे नियमित कर्जफेड प्रोत्साहन योजनेच्या लाभासाठी चालू वर्षातील वसूलपात्र रक्कम मुदतीत भरा, असे कळकळीचे आवाहन केडीसीसी बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना केले आहे. या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उच्चांकी कर्ज वसुलीची उज्वल परंपरा अखंड ठेवूया, असे आवाहनही केले आहे.
पत्रकात मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026" ही योजना आणलेली आहे. शासनाच्या निकषानुसार दि. 30 जून 2025 अखेर थकीत असलेले तसेच; दि. 30 सप्टेंबर 2025 अखेर दोन लाख रुपयांपर्यंत शिल्लक पीक कर्जाची थकबाकी असलेले शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरणार आहेत. तसेच; सन 2022-23, 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षांत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे, असेही मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे, राज्य शासनाच्या या योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकीत तसेच, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील बँकांकडून पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करून पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी शासनाने अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. राज्यातील सर्व बँकांकडून पीक कर्ज, मध्यम मुदत कर्ज तसेच दीर्घ मुदत कर्जाची माहिती मागविण्यात आली आहे. लवकरच योजनेचे निकष शासनाकडून जाहीर करण्यात येणार आहेत.
दरम्यान; रब्बी म्हणजेच ऊस हंगामाचा कर्जपुरवठा दि एक जुलै २०२४ ते ३० जून २०२५ असा होता. या कर्जाची परतफेडीची मुदत दि. ३० जून २०२६ अखेर आहे. त्यामुळे हे वर्ष कर्जमाफी योजनेमध्ये पात्र धरलेले नाही. त्यामुळे प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घेण्यासाठी चालू वर्षातील वसूलपात्र कर्जाची मुदतीत परतफेड करणे अत्यावश्यक आहे. जर शेतकऱ्यांनी चालू वर्षाचे कर्ज मुदतीत भरले नाही, तर असे शेतकरी शासनाच्या प्रोत्साहनपर लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे सर्व शेतकरी सभासदांनी तात्काळ चालू वर्षातील वसूलपात्र कर्जाची परतफेड करून शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा.
मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे, गतवर्षी म्हणजेच जून -२०२५ अखेरची थकबाकी कर्जमाफीसाठी पात्र होणार आहे, हे सरकारने याआधीच जाहीर केलेले आहे. त्यामुळेच ३० जून २०२६ अखेर थकबाकी राहिल्यास असा शेतकरी शासनाच्या कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेतून वगळला जाणार आहे.
▪️उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया.....!
पत्रकात मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दरवर्षीची उच्चांकी लिंकींग वसुलीची परंपरा कोल्हापूर जिल्ह्यातील बहाद्दर शेतकऱ्यांनी निर्माण केलेली आहे. दरवर्षीच ही वसुली ९१ टक्के ते ९९ टक्केच्या घरात असते. केडीसीसी बँकेची उच्चांकी कर्ज वसुलीची ही उज्वल परंपरा यावर्षीही अखंडितपणे जपूया. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करा.