छत्रपती शंभूराजेंच्या भव्य शिल्पामुळे शिरोळच्या इतिहासाला मिळाला उजाळा : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
schedule13 May 26 person by visibility 88 categoryराज्य
◼️शिरोळ येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पाचे मोठ्या उत्साहात अनावरण
शिरोळ : शिरोळ शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य शिल्प उभारल्याने इतिहासाला नव्याने उजाळा मिळाला आहे, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे उभारण्यात आलेल्या भव्य शिल्पाच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. शिरोळ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे तसेच छत्रपती ताराराणींचे तख्त राहिलेले शहर असून या ऐतिहासिक वारशाचे जतन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात शिरोळ शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
शंभूराजांचे शिल्प हे केवळ स्मारक नसून पुढील पिढीला प्रेरणा देणारे शक्तीस्थान ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य शिल्पाचे अनावरण आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आले, यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले, शहरातील विविध चौक आणि ऐतिहासिक स्थळांचे सुशोभीकरण करून शिरोळला पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कलेश्वर तलाव परिसरात म्युझिक फाउंटन तसेच तलावाच्या मध्यभागी शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडली.
कुरुंदवाड येथील ऐतिहासिक विष्णू मंदिराच्या सुशोभीकरणासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला असून, तालुक्यातील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांचा विकास करून पर्यटनाला चालना देण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जयसिंगपूर परिसरात पर्यटन पार्क उभारण्याचाही प्रस्ताव शासनाकडे दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
शहराच्या सुशोभीकरणाबरोबरच पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांनाही प्राधान्य देणार असल्याचे सांगून, सर्वांना सोबत घेऊन शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्यास हजारो शिवभक्त, नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे कार्यकर्ते तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी आणि भगव्या पताकांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेले हे भव्य शिल्प शिरोळ तालुक्यातील पहिले अशा प्रकारचे स्मारक ठरले आहे. त्यामुळे भविष्यात शिरोळची नवी ओळख म्हणून या ठिकाणाकडे पाहिले जाणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. अनावरण सोहळ्यानिमित्त चौक परिसरात आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मिरज येथील साई लाईटच्या भव्य लाईट शोने संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. तसेच दणदणीत आतषबाजीमुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली.
कार्यक्रमात प्रसिद्ध जय भवानी लेझीम पथकाने शानदार मानवंदना सादर केली. संतूबाई तालीम, हेरवाड यांच्या वतीने शिवकालीन मर्दानी खेळांचे थरारक सादरीकरण करण्यात आले. तलवारबाजी, दांडपट्टा आणि युद्धकौशल्याचे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शंभो ऑडिओच्या अत्याधुनिक साउंड सिस्टीममुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
यावेळी ३ ते १४ वयोगटातील मुलांसाठी आयोजित शिवकालीन वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान मुलांनी शिवराय, संभाजी महाराज, मावळे आणि जिजाऊ यांच्या वेशभूषेत सहभाग घेत उपस्थितांची मने जिंकली. तरुणांसाठी आयोजित रिल स्पर्धेलाही मोठा प्रतिसाद लाभला. विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या ऐतिहासिक सोहळ्यामुळे शिरोळ शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली असून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे हे भव्य शिल्प शिवभक्तांसाठी प्रेरणास्थान ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. प्रास्ताविक प्रवीण चुडमूंगे यांनी केले.
या प्रसंगी यावेळी माजी आमदार उल्हास पाटील,
अमरसिंह पाटील, समाजकल्याण सभापती श्रध्दाताई गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, रामचंद्र डांगे, भवनिसिंह घोरपडे, कुरुंदवाडचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, प्रमोददादा पाटील, रणजित पाटील, सतिश मलमे, बाबा पाटील, अभिजित जगदाळे, विजितसिंह देशमुख, दिग्वीजय माने, नगरसेवक शरद मोरे, शिवानी कांबळे, अमर शिंदे यांच्यासह सर्व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक पदाधिकारी व हजारो शिवभक्त उपस्थित होते.
◼️शिल्पाचे मुख्य संकल्पक दिग्विजय माने यांचा सत्कार
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य शिल्पाच्या अनावरण सोहळ्यात शिल्पाचे मुख्य संकल्पक दिग्विजय माने यांचा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. शिरोळ शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारे हे भव्य शिल्प उभारण्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे यावेळी कौतुक करण्यात आले. शिल्प उभारणीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत नियोजनबद्ध काम केल्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या भाषणात नमूद केले. कार्यकर्ता मोठा की लहान यापेक्षा त्याची जिद्द आणि काम पूर्ण करण्याची तळमळ महत्त्वाची असते, असे सांगत आमदार यड्रावकर यांनी दिग्विजय माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. शंभूराजांचे भव्य शिल्प उभारण्यामागे दिग्विजय माने यांची संकल्पना आणि मेहनत महत्त्वाची ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित शिवभक्त आणि नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा गौरव केला.